रेंट-अ-कॅब थारवर निर्बंध घालणार : वाहतूकमंत्री

0
2

रेंट-अ-कॅबमधील महिंद्रा थार वाहनांच्या अपघातांच्या वाढत्या संख्येची आणि धोक्याची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, रेंट-अ-कॅब श्रेणीत महिंद्रा थार वाहनांवर निर्बंध घालण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी राज्यातील वाहतूक व्यवस्थेसंबंधीच्या एका बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे काल दिली. रेंट-अ-कॅब श्रेणीतील थार वाहनामुळे गेल्या एक-दोन महिन्यांत अनेक अपघात घडले असून, काही जणांचा हकनाक बळी गेला, तर काही जण जायबंदी झाले. त्यामुळे थारवर निर्बंध घालण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत.

राज्यातील वाढत्या वाहन अपघातांच्या विषयांवर पोलीस, वाहतूक विभाग यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच अपघातांवर नियंत्रण आणण्याकरिता उपाययोजनांवरही चर्चा झाली. राज्यात रेंट अ कारगाड्यामुळे जास्त अपघात होतात. या रेंट-अ-कॅब श्रेणीतील थार वाहनामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे थार वाहनांना रेंट-अ-कॅब श्रेणीमध्ये निर्बंध घालण्याची शिफारस राज्य वाहतूक प्राधिकरणाकडे केली जाणार आहे. रेंट-अ-कॅब श्रेणीत थार वाहनांना मान्यता दिली जाणार नाही, असेही वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

वाहतूक खाते, वाहतूक पोलीस यांच्याकडून राज्यातील वाहतुकीवर कडक देखरेख ठेवली जाणार आहे. रेंट-अ-कॅब व इतर प्रवासी वाहनांसाठी स्पीड गव्हर्नर आणि मद्यपी वाहनचालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. राज्यात मागील दोन वर्षांपासून नवीन रेंट-अ-कॅबना मान्यता देणे बंद केले आहे. तसेच, 12 वर्षे पूर्ण झालेल्या रेंट-अ-कॅबच्या परवान्यांचे नूतनीकरण केले जाणार नाही, असेही वाहतूकमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील रेंट-अ-कॅबचा आढावा घेण्याचा निर्देश देण्यात आला आहे. रेंट-अ-कॅब मालकांकडून नियमांचे पालन केले जाते की नाही, याचा आढावा घेतला जाणार आहे. रेंट-अ-कॅब गाड्या पार्किंगच्या मुद्द्याचाही आढावा घेतला जाणार आहे. काही रेंट-अ-कॅब मालकांकडून सार्वजनिक जागेत पार्किंग, तसेच अन्य खासगी जागेत विनापरवाना गाड्या पार्क केल्या जात आहेत, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.

15 जुलैपासून एआय कॅमेरे कार्यान्वित
राज्यात येत्या 15 जुलैपासून 26 ठिकाणी एआय कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. तसेच सप्टेंबर 2026 पासून आणखी 26 ठिकाणी एआय कॅमेरे कार्यान्वित केले जाणार आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत एकूण 92 ठिकाणी एआय कॅमेरे कार्यान्वित केले जाणार आहेत, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

मोबाईल येणार दंडाचे चलन
सध्या राज्यात 26 ठिकाणी एआय कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, त्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे टिपले जात आहे. या वाहतूक नियमभंग प्रकरणात स्वयंचलित पद्धतीने दंडाचे चलन तयार होत आहे. मात्र, सध्याच्या घडीला वाहनमालकांना दंडाचे चलन पाठविले जात नाही. येत्या दोन दिवसांपासून वाहनमालकांना दंडाबाबतची सूचना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविली जाणार आहे. येत्या 15 जुलैपासून एआय कॅमेऱ्याने टिपलेले वाहतूक नियम उल्लंघनाचे चलन वाहनमालकाला पाठविले जाणार आहे, असेही वाहतूकमंत्री गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

नियम पाळा, दंड टाळा
राज्यातील वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे योग्य पालन करावे. त्यांना दंडाचे चलन पाठविले जाणार नाही. राज्य सरकारने महसूल गोळा करण्यासाठी एआय कॅमेरे बसविलेले नाहीत, तर वाहतुकीत शिस्त यावी, या उद्देशाने एआय कॅमेरे बसविले आहेत, असेही वाहतूकमंत्री म्हणाले.

एका दिवसात 56 हजार 536
वाहतूक नियमभंगाची प्रकरणे नोंद
गेल्या 4 जुलै 2026 रोजी एकाच दिवशी एआय कॅमेऱ्याच्या माध्यमातून 56 हजार 536 वाहतूक नियमभंगाच्या प्रकरणाची नोंद झाली आहे. त्यात 43 हजार 352 जणांनी सीट बॅल्टचा वापर केला नव्हता, 13 हजार 072 जणांकडे वाहनांचा विमा नव्हता, 2468 जणांनी हेल्मेट परिधान केले नव्हते, असेही वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.