रेंट-अ-कारचा पाठलाग करणारी सेडान कार हुबळी येथून ताब्यात

0
4

>> जुने गोवे पोलिसांना यश; बेळगावातील दोघांची चौकशी सुरू

>> बाशुदेवच्या भावाकडून तक्रार नोंद; अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद

तिसवाडी तालुक्यातील टोटलो, सांतइस्तेव फेरी धक्क्यावरून नदीपात्रात गेलेल्या रेंट-अ-कारचा पाठलाग करणारी सेडान कार हुबळी-कर्नाटक येथे ताब्यात घेण्यात जुने गोवे पोलिसांना यश मिळाले आहे. अपघातानंतर जवळपास एका आठवड्यानंतर शनिवारी सायंकाळी पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली. त्यावेळी रेंट-अ-कारचा पाठलाग करणाऱ्या सेडान कारमधील दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी बेळगाव येथील यासिम गौस (32) आणि सलमान ऊर्फ मोहम्मद गौस (28) यांना ताब्यात घेतले आहे.

जुने गोवे पोलीस स्थानकात बाशुदेव भंडारीचा भाऊ बलराम भंडारी याने शनिवार 7 सप्टेंबरला तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. माशेल येथे 1 सप्टेंबरला मध्यरात्री बाशुदेव भंडारी चालवत असलेल्या रेेंट-अ-कारचा एका निळ्या रंगाच्या सेडान कारने पाठलाग केल्यामुळे घाबरलेला बाशुदेव हा मिळेल तेथून रस्ता काढत टोटलो सांतइस्तेव येथील फेरी धक्क्यावर पोहोचला. रात्रीच्या काळोखात अंदाज न आल्याने रेंट-अ-कार पाण्यात गेली आणि बाशुदेव भंडारी आणि त्याची मैत्रीण नदीच्या पात्रात पडली होती. बाशुदेव याची मैत्रीण पाण्यातून बाहेर येण्यास यशस्वी झाली, तर बाशुदेव हा तेव्हापासून अद्यापपर्यंत बेपत्ता आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ॲडविन डायस पुढील तपास करत आहेत.

सेडान कारचा क्रमांक
‘जीए-07-ई-5395′

जुने गोवे पोलिसांनी या सेडान कारच्या शोधासाठी 4 पथकांची नियुक्ती केली होती. त्यानंतर टोयोटा इटियॉस ह्या जीए-07-ई-5395 या निळ्या रंगाच्या सेडान कारचा शोध घेण्यास सुरुवात केली. सदर कार मूळ बेळगाव येथे राहणाऱ्या एका इसमाने वास्को येथील व्यक्तीकडून कुंकळ्ळी येथून खरेदी केली होती व सध्या बेळगाव येथे वापरण्यात येत होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

सेडानला धक्का लागला अन्‌‍…
दुर्घटना घडली त्या दिवशी यासिम गौस (32) व सलमान ऊर्फ मोहम्मद गौस (28) हे दोघे सदर कार चालवत होते. पणजी येथे कॅसिनोत जुगार खेळून मध्यरात्रीच्या सुमारास माशेलमार्गे ते बेळगावला जात होते.
माशेल येथे रेंट-अ-कारचा धक्का या निळ्या सेडानला लागला. या अपघातानंतर त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली.
यानंतर सेडान कारमधील व्यक्तींनी रेंट-अ-कारचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरून बाशुदेवने पणजीच्या दिशेने जाण्यासाठी जोरात कार चालवायला सुरुवात केली.
त्यानंतर तो टोटलो सांतइस्तेव येथील फेरी धक्क्यावर पोहोचला; मात्र पुढे जाण्याचा मार्ग नव्हता. त्याच्या मागोमाग सेडान कार फेरीधक्क्यावर आली. त्यामुळे बाशुदेवने आपली रेंट-अ-कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता कार नदीच्या पात्रात गेली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

‘जीए-07′ क्रमांकावरून घेतला शोध
बाशुदेवसोबत कारमध्ये असलेल्या त्याच्या मैत्रिणीने निळ्या रंगाच्या सेडान कारचा ‘जीए-07′ असा क्रमांक पोलिसांना दिला होता. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक खात्याशी संपर्क साधून सदर कारबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. कारचा पूर्ण क्रमांक माहीत नसतानाही पोलिसांनी तपास करत कारचा संपूर्ण क्रमांक मिळवत पुढील तपास सुरू केला.