रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षातील वाद विकोपाला

0
8

पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांच्याकडून स्वकीयांवर जहरी टीका; आमदार वीरेश बोरकरांकडून स्वत:चा ‘अध्यक्ष’ असा उल्लेख

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) अध्यक्ष मनोज परब आणि सांत आंद्रेचे आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांच्यात सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर आरजीपीमध्ये दोन गट तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्यावर टीका करणारे म्हणजे ‘वीरेश बोरकर यांचे भाड्याचे बैल’ अशा शब्दांत मनोज परब यांनी काल टीका केली. मनोज परब यांच्याकडून होणाऱ्या आरोपांबाबत आमदार वीरेश बोरकर यांनी सुरुवातीला मौन बाळगले होते; पण आता आमदार वीरेश बोरकर यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला ‘पीस’ म्हणजे शांतता राखा, अशी पोस्ट बोरकर यांनी केली, तेवढ्यावरच न थांबता त्यांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलमध्ये स्वत:ला ‘आरजीपीचा अध्यक्ष’ घोषित केले.

आरजीपीच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत वादावादी सुरू होती. या वादावर तोडगा निघत नव्हता. अखेर मनोज परब यांनी आमदार वीरेश बोरकर यांच्या समर्थकावर सोशल मीडियावरून आरोप केल्यानंतर या वादाला तोंड फुटले. त्यानंतर बोरकर यांचे समर्थक मनोज परब यांच्या टीकेला उत्तर देत होते.
आता, स्वत: आमदार वीरेश बोरकर यांनी सोशल मीडियावरील टीकेला उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. बोरकर यांनी बुधवारी रात्री फेसबुकवर ‘पीस’ म्हणजे शांतता असा संदेश पोस्ट करून संयम राखण्याचे आवाहन केले. ‘पीस’ संदेशाला मनोज परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या पोस्टवर हिरव्या वाटाण्याचा इमोजी पोस्ट करून बोरकर यांच्या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. तसेच, जोरदार टीकाही केली.

वीरेश बोरकरांकडून ‘पक्षाध्यक्ष’ असा उल्लेख

आमदार वीरेश बोरकर यांनी आपले फेसबुक प्रोफाईल अपडेट केले. त्यात त्यांनी स्वतःला रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचा ‘अध्यक्ष’ घोषित केले आहे. तसेच, ‘आधी आले 39 अ …. आता त्याचे दुष्परिणाम’ अशी गूढ टिप्पणी बोरकर यांनी केली. सोशल मीडियावर हा विषय आता चांगलाच चर्चेत आहे.

शांतता हवी, तर चर्चेला या : सरचिटणीस

आमदार वीरेश बोरकर यांना खरोखर शांतता हवी असेल, तर आगामी बैठकीवेळी चर्चेसाठी यावे, तुम्हाला व्हॉट्सअप आणि ईमेलद्वारे संदेश पाठविला आहे, असे आरजीपीचे सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कलम 39 अ विरोधी आंदोलनानंतर पक्षात धुसफूस

आमदार वीरेश बोरकर यांच्या टीसीपीच्या 39 अ विरोधातील आंदोलनानंतर आरजीपीमध्ये धुसफुस सुरू झाल्याचा दावा आरजीपीचे माजी कार्यकर्ते आदित्य देसाई यांनी काल केला. वीरेश बोरकर यांच्या अनुपस्थितीत आरजीपी-सीईसीने पक्ष बंद करण्याचा निर्णय घेतला होता, असा आरोप आदित्य देसाई यांनी केला. राज्यातील टीसीपीच्या 39 अ चे समर्थन करणारे व्यावसायिक किंवा राजकारणी यांच्यासह बाहेरील शक्ती या सध्याच्या गोंधळामागे असू शकतात, असेही देसाई यांनी म्हटले आहे.