भाजपच्या शेवटच्या यादीत 2 उमेदवारांची घोषणा
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने (आरजीपी) उमेदवारांची नावांची पहिली यादी काल जाहीर केली, त्यात 12 उमेदरावांचा समावेश आहे. तसेच भाजपने काल चौथ्या आणि शेवटच्या यादीत 2 उमेदवारांची घोषणा केली. भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आत्तापर्यंत 40 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या दवर्ली मतदारसंघात सत्यविजय नाईक आणि नावेली मतदारसंघात लक्ष्मी बाबुराव शेटकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी 7 उमेदवार, तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी 5 उमेदवार जाहीर केले आहेत.
आरजीपीने तोरसे मतदारसंघातून नारायण शिरोडकर, शिवोलीतून जयंद्रथ पाडोलकर, कोलवाळमधून प्रज्ञा सावंत, शिरसईतून सिप्रियान परेरा, हणजूणमधून मिंगेल क्विरोझ, सांताक्रूझमधून एस्पेरांका ब्रांगाझा, सेंट लॉरेन्समधून तृप्ती बकाल यांना उमेदवारी दिली आहे. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बेतकी-खांडोळा मतदारसंघातून विनय गावडे, वेलिंग-प्रियोळमधून नीता जल्मी, कवळेतून विश्वेश नाईक, बोरीतून हर्षा बोरकर आणि शिरोडा मतदारसंघातून दीपिंती शिरोडकर यांना मैदानात उतरवले आहे.
आरजीपीची निवडणूक समिती आणि गाभा समितीच्या बुधवारी रात्री घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा पंचायत निवडणुकीवर चर्चा करून काही मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांनी गुरुवारी सकाळी उमेदवारांची यादी जाहीर केली
11 उमेदवारी अर्ज सादर
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी विविध मतदारसंघांतून अकरा उमेदवारांनी आपले अर्ज गुरुवारी दाखल केले. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आत्तापर्यंत एकूण 12 अर्ज दाखल झाले आहेत. त्यात भाजपच्या 7, कॉँग्रेसच्या 1 आणि 3 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
कोणी केले अर्ज दाखल?
कळंगुटमधून फ्रांझिला रॉड्रिगीस, सुकूरमधून अमित अस्नोडकर, रेईश मागूशमधून रेश्मा संदीप बांदोडकर आणि सुस्मिता सुभाष पेडणेकर, पेन्हा दी फ्रान्समधून संदीप साळगावकर, उसगाव-गांजेमधून मनिषा उसगावकर, बेतकी-खांडोळामधून सुनील जल्मी, सावर्डेतून मोहन गावकर, धारबांदोड्यातून रुपेश देसाई, पैंगीणमधून दीक्षा पागी आणि विपीन प्रभुगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
भाजप जिल्हा पंचायतींच्या 40 जागा लढवणार
भारतीय जनता पक्ष जिल्हा पंचायतीच्या एकूण 50 पैकी 40 जागा लढविणार आहे. भाजपने 3 जागा मगोपला दिल्या असून, उर्वरित 7 जागांवर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार आहे. भाजपचा जिल्हा पंचायत निवडणूक जाहीरनामा आगामी दोन दिवसांत प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष दामू नाईक यांनी काल दिली. भाजपने जिल्हा पंचायतीच्या सर्व उमेदवारांची घोषणा केली असून, सर्व उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. मगोकडून तीन मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत, असेही नाईक म्हणाले.
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार जाहीर?
राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आतापर्यंत भाजपने 40, आम आदमी पक्षाने 29, काँग्रेसने 11 आणि आरजीपीने 12 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. गोवा फॉरवर्डने अजूनपर्यंत उमेदवारांची नावे अधिकृतपणे जाहीर केलेली नसली तरी, गोवा फॉरवर्डच्या काही उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे.