राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विचारसरणीतील भ्याडपणा हेच मूळ आहे, अशी टीका काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. कोलंबियातील ईआयए विद्यापीठात ‘द फ्युचर इज टुडे’ परिषदेत राहुल गांधी यांनी हे विधान केले. ते सध्या दक्षिण अमेरिकेच्या 10 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
आपल्या दाव्याच्या स्पष्टीकरणासाठी राहुल गांधी यांनी सन 2023 मध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनबाबत केलेल्या विधानाचा हवाला दिला. जर परराष्ट्रमंत्र्यांचे विधान नीट लक्षात आले तर ते म्हणाले होते की, चीन आपल्यापेक्षा खूप शक्तिशाली आहे. मी त्यांच्याशी कसा लढू शकतो? या अशा विचारसरणीच्या मुळाशी भ्याडपणा आहे, या शब्दांत राहुल गांधी हल्लाबोल केला. आरएसएसची विचारसरणी कमकुवत लोकांवर अधिकार गाजवणे आणि त्यांच्यापेक्षा जे बलवान आहे, अशा लोकांपासून पळून जाणे, अशी आहे. भाजप-आरएसएसचा स्वभावच असा आहे, असेही ते म्हणाले. यावेळी राहुल गांधींनी कोलंबियातून भारत सरकारवरही जोरदार टीका केली. भारतासमोरील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीवरील हल्ला आहे, असेही ते म्हणाले.

