राहुल गांधींच्या कॉंग्रेसाध्यक्षपदाचा अन्वयार्थ

0
118
  • ल. त्र्यं. जोशी
    (नागपूर)

राहुल कॉंग्रेसाध्यक्ष होत असल्याने पक्षासमोरील पुढच्या सुमारे साठ वर्षांची अध्यक्षपदाची चिंता जशी मिटली तशीच पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचीही चिंता मिटली आहे. आता भाजपाविरोधी पक्षात त्या उमेदवारीवर दावा करु शकणारा एकही नेता उरलेला नाही.

कॉंग्रेसाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल गांधी यांचे एकट्याचेच नामांकन आल्याने त्यांची या पदावरील ‘निवड’ आता केवळ औपचारिकरीत्या बाकी राहिली आहे. कॉंग्रेससमोर अध्यक्षपदासाठी राहुलशिवाय अन्य पर्याय उपलब्ध होता काय असा प्रश्न उपस्थित केल्यास त्याचे उत्तर नकारार्थीच येईल. याचा अर्थ अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याच्या लायकीचे नेतेच कॉंग्रेस पक्षात नाहीत, असा मात्र नाही. तसा विचार केला तर यावेळी पी. चिदम्बरम, ज्योतिरादित्य शिंदे, गुलाम नबी आझाद यांच्यासारखे काही नेते कॉंग्रेसाध्यक्षपद स्वीकारण्यालायक नक्कीच होते. पण त्यांचे दुर्दैव इतकेच की, त्यांचा जन्म नेहरु गांधी परिवारात झाला नाही. त्यामुळे कुत्सितपणे का होईना, पण मणिशंकर अय्यर यांना राहुलच्या नामांकनाच्या वेळी मोगली वारसा परंपरेची आठवण झाली असेल तर ते स्वाभाविकच म्हणावे लागेल.

कॉंग्रेसाध्यक्षपदाची परंपरा पाहिल्यास या पदावर नेहरुगांधी परिवाराचाच हक्क प्रस्थापित होईल अशी व्यवस्था पूर्वीपासूनच करण्यात आल्याचे दिसून येईल. नेताजी सुभाषचंद्र बोस, राजर्षि टंडन, आचार्य कृपलानी ही काय कमी तोलामोलाची माणसे होती? पण त्यांना कॉंग्रेसाध्यक्ष म्हणून सुखासुखी स्वीकारण्यात आले नाही. यू. एन. ढेबर, देवराज अर्स, देवकांत बरुआ, सीतारात केसरी यांच्यासारखे नेते कॉंग्रेसाध्यक्ष जरुर बनले, पण ते नेहरु गांधी परिवाराच्या नियंत्रणात राहतील याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. कॉंग्रेसच्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात कदाचित कामराज हेच एकमेव अध्यक्ष असतील, ज्यांनी पंतप्रधानपदापेक्षा पक्षाध्यक्षपद मोठे असल्याचे सिध्द करण्याचा काही काळ तरी यशस्वी प्रयत्न केला, कारण कामराज यांच्याच आग्रहामुळे इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातील काही सदस्यांना पक्षकार्यासाठी आपली मंत्रिपदे सोडावी लागली. अर्थात त्यातही इंदिराजींची राजकीय सोय असल्याने त्यांनी कामराज यांना विरोध केला नाही. पण त्याचबरोबर पुढे कामराज यांच्या इच्छेने संजीव रेड्डी यांना देण्यात आलेली राष्ट्रपतिपदाची उमेदवारी इंदिराजींनी कशी उधळून लावली हाही काही फार जुना इतिहास नाही.

गेल्या १९ वर्षांत कॉंग्रेसमध्ये अनेक कर्तृत्ववान नेते असतानाही कॉंग्रेसाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पक्षाला सोनिया गांधींशिवाय एकही नेता सापडू नये याचा शेवटी काय अर्थ आहे? सोनियांजवळ गांधी घराण्याची सून याशिवाय अन्य कोणते भांडवल होते? त्यांनी पंतप्रधान बनण्याची संधी सोडली हे खरेच, पण त्याच्या कारणांचा अजूनही तर्कसंगत उलगडा झालेला नाही. शिवाय संपुआच्या काळात मनमोहनसिंग नामधारी पंतप्रधान होते आणि सरकारची सर्व सूत्रे १० जनपथमधूनच हलत होती हे काही आता गुपित राहिलेले नाही. याचा अर्थच असा आहे की, नेहरु गांधी परिवाराने सरकार आणि पक्ष यांच्यावर आपल्या परिवारातील नेत्याचेच प्रभुत्व राहावे, त्या जागी अन्य कुणी येणारच नाही असे प्रयत्न सतत केले. ज्यावेळी पर्यायच नव्हता, त्यावेळी त्यांनी लालबहादूर शास्त्री, नरसिंहराव यांच्यासारख्या कॉंग्रेसी नेत्यांना आणि चंद्रशेखर, विश्वनाथप्रताप सिंग, इंद्रकुमार गुजराल यांच्यासारख्या माजी कॉंग्रेसी नेत्यांना पंतप्रधानपदावर बसू दिले. कॉंग्रेसाध्यक्षपदीही देवकांत बरुआ, साीतारात केसरी, नरसिंहराव यांच्यासारखे नेते सहन केले, पण अन्यथा त्यांची पसंती नेहरु गांधी परिवारालाच राहिली आहे हे निर्णायकपणे सिध्द होते. त्यामुळे राहुल गांधी कॉंग्रेसाध्यक्ष होणे हे नेहरु गांधी परिवाराच्या परंपरेला साजेसेच आहे असे म्हणावे लागेल. अन्य नेत्यांबद्दल नाही, पण राहुल गांधींबद्दल असे निश्चित म्हणता येईल की, कर्तृत्वाच्या बाबतीत सर्वाधिक असफल ठरलेले ते पहिले कॉंग्रेसाध्यक्ष ठरतील. प्रत्येक असफलतेनंतर बढतीच मिळत जावी असे त्यांचे भाग्य आहे. त्यामुळे ते कॉंग्रेसला कसे गतवैभव प्राप्त करुन देतील हा प्रश्नच आहे.

मुळात कॉंग्रेस पक्ष आणि स्वत: राहुल गांधी घराणेशाहीला अनिष्ट प्रथा मानत नाहीत. नुकत्याच केलेल्या अमेरिकादौर्‍यात तर त्यांनी घराणेशाहीचे समर्थनच केले होते. ते म्हणाले की, भारतात वंशपरंपरा प्रस्थापितच मानली जाते. तेथे अनेक राजकीय पक्ष घराणेशाहीच्या बळावरच कार्य करतात. त्यांच्यासमोर मुलायमसिंगांचा समाजवादी पक्ष, लालुप्रसादांचे राष्ट्रीय जनता दल, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वा शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस असणे सहजशक्य आहे. त्यातून त्यांनी घराणेशाही आपल्याला वर्ज्य नसल्याचेच सूचित केले होते. तरीही कॉंग्रेस पक्ष नेहमीच घराणेशाहीचा इन्कार करीत आला आहे. राहुल गांधींच्या अध्यक्षपदावरील निवडणुकीसाठी उभा करण्यात आलेला देखावाही त्याच रणनीतीचा एक भाग आहे. त्यासाठी योजून प्रयत्न करण्यात आले. तरीही त्यांच्यावरील तो ठपका काही पुसला जात नाही. यावेळीही राहुलच्या नामांकनाच्या वेळी सोनिया गांधी वा प्रियंका वाड्रा यांची अनुपस्थिती त्या प्रयत्नाचा एक भाग होता. पण त्यामुळेही कॉंग्रेस घराणेशाहीचा ठपका पुसण्यात सफल झाली असे म्हणता येणार नाही. प्रियंकाच्या अनुपस्थितीचे तर आणखी एक कारण आहे. एक तर त्या समोर आल्या तर लोकांना रॉबर्ट वाड्रा दिसायला लागतात आणि दुसरे म्हणजे त्या समोर आल्या की, त्याच माध्यमांसाठी लक्षवेधी ठरतात आणि राहुल झाकोळले जातात.कदाचित सोनियांना ते होऊ नये असे वाटत असावे. अध्यक्षपदाचे नामांकन हा सर्वस्वी राहुलचा शो असावा याची पुरेपूर काळजी घेण्यात आली.

राहुल कॉंग्रेसाध्यक्ष होत असल्याने पक्षासमोरील पुढच्या सुमारे साठ वर्षांची अध्यक्षपदाची चिंता जशी मिटली तशीच पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचीही चिंता मिटली आहे. आता भाजपाविरोधी पक्षात त्या उमेदवारीवर दावा करु शकणारा एकही नेता उरलेला नाही. राहुल असतांना ती उमेदवारी आपल्याला मिळणे शक्य नाही हे लक्षात घेऊनच नितीशकुमार यांनी महागठबंधनाचा नाद सोडला. शरद पवार यांची उमेदवारी निकालात निघाली आहे. आता भाजपाविरोधी नेत्यांमध्ये ममता बॅनर्जी व मायावती ह्या दोनच नेत्या उरल्या आहेत, ज्या त्या उमेदवारीवर दावा करु शकतात. पण राहुल कॉंग्रेसाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा दावा कितपत मान्य होईल हा लाखमोलाचा प्रश्न आहे. याउपरही त्यांना आपली पंतप्रधानपदावरील उमेदवारी पुढे दामटायचीच असेल तर त्यामुळे कॉंग्रेसचे महागठबंधनाचे स्वप्न भंग होण्याची अधिक शक्यता आहे. त्या स्थितीत कॉंग्रेस एकाकी पडण्याचीच शक्यता अधिक आहे. डाव्या पक्षांसाठी ममता बॅनर्जी सोयीच्या नसल्या तरी त्यांना कॉंग्रेस व मायावती यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. म्हणजेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए, कॉंग्रेस व तिसरी आघाडी अशी लढत होणे अपरिहार्य ठरेल. अर्थात सगळे काही हिमाचलच्या नव्हे पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे.