25.7 C
Panjim
Friday, September 17, 2021

राहुलच्या पदारोहणाची तयारी

  • ल. त्र्यं. जोशी

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात अल्पसंख्यक समाजाला चेतविण्याचे त्यांनी केलेले कामच पक्षाला तारु शकेल अशी भावना असलेला मोठा वर्ग कॉंग्रेस पक्षात आहे. ज्या पध्दतीने प्रसारमाध्यमेही त्यांनाच उचलून धरतात ते पाहता कॉंग्रेसला अजूनही राहुलशिवाय पर्याय नाही, असे वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यकाळात कॉंग्रेसचे अध्यक्षपद त्यांच्याकडे पुन्हा आले तर ते आश्चर्य ठरणार नाही.

कॉंग्रेस कार्यकारिणीची लवकरात लवकर निवडणूक घेऊन श्रेष्ठींनी म्हणजेच सोनिया गांधींनी पक्षाला मजबूत नेतृत्व द्यावे अशी मागणी कॉंग्रेस पक्षात महत्त्वाच्या नेत्यांकडून होत असली, तरी त्यामुळे पक्षावरील गांधी परिवाराची पकड ढिली होईल असे कुणाला वाटत असेल तर तो गोड गैरसमज ठरेल. गेल्या काही दिवसांत ज्येष्ठ खासदार शशी थरुर, जयराम रमेश, वीरप्पा मोईली, एवढेच नव्हे तर रणजितसिंह सुरजेवाला यांनी देखील तशी मागणी केली आहे. पण या नेत्यांना जेव्हा ‘तुम्हाला गांधेतर अध्यक्ष अपेक्षित आहे काय’, असा प्रश्न विचारला की, ते स्पष्ट उत्तर द्यायला कचरतात आणि गांधी परिवाराचे गोडवे गायला सुरुवात करतात.

वस्तुत: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन गांधेतर अध्यक्षाची निवड करावी अशी सूचना केली होती. वरिष्ठ नेत्यांनी अध्यक्षपद सोडण्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकले नाही. शेवटी हंगामी व्यवस्था म्हणून पुन्हा एकदा सोनिया गांधींकडेच नेतृत्व सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यालाही आता दहा महिने होत आहेत, पण सोनिया काही जबाबदारीतून मुक्त होत नाहीत आणि पक्षाला नवा अध्यक्ष काही मिळत नाही. तसे पाहिले तर कॉंग्रेसाध्यक्ष निवडण्याची पध्दत ठरली आहे. प्रथम सदस्य नोंदणी होते. गट पातळीपासून पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जातात. कॉंग्रेस महासमितीची निवड केली जाते व त्यानंतर अध्यक्ष व कॉंग्रेस कार्यकारिणीची निवड होते. पण दीर्घ काळापासून या पध्दतीने पक्षांतर्गत निवडणुकाच झाल्या नाहीत व तूर्त होण्याची शक्यताही दिसत नाही. प्रत्येक वेळी शॉर्टकट मारला जातो व कार्यकारिणीची निवड केली जाते. शशी थरुर यांचे म्हणणे असे की, त्या पध्दतीनेच निवडणुका घ्याव्यात व रीतसर अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड व्हावी. पण त्यांच्या भूमिकेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. कॉंग्रेस अध्यक्षपदी कुणाचीही आणि कशीही निवड करा, पण त्या पदावर गांधी परिवारापैकीच कुणी तरी असले पाहिजे या मुद्द्यावर गाडी थांबते.

गांधी परिवाराची अडचण अशी आहे की, सोनिया गांधींची तब्येत ठीक नाही. त्यामुळे त्या एवढी मोठी जबाबदारी सांभाळूच शकत नाहीत. राहुलचा पर्याय तयार झाला होता, पण तो इतक्या वाईट रीतीने संपुष्टात आला की, गेली पंधरा वर्षे सातत्याने राजकारणात असूनही आणि नेतृत्वाच्या अनेक संधी मिळूनही ते पात्रता सिध्द करु शकले नाहीत. कॉंग्रेसच्या पुण्याईमुळे पक्षाला काही ठिकाणी यश मिळत गेले, पण त्यात प्रादेशिक नेतृत्वाचा वाटा अधिक होता, पण श्रेय मात्र राहुलला मिळत गेले. तरीही २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा एवढा प्रचंड पराभव झाला की, आता पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे नेतृत्व द्यायला धजावत नाहीत. गांधी परिवारातील जन्म, अभ्यासाचा अभाव ह्याच त्यांच्या जमेच्या बाजू. सातत्याने त्यांनी स्वत:ला पक्षकार्यासाठी झोकून दिले असे गेल्या १५ वर्षात कधीही घडले नाही. मध्येच धुमकेतूसारखे ते उगवतात, चमकतात व मग दीर्घ काळ निष्क्रिय राहतात. त्यांना केव्हा सुटीवर परदेशात जाण्याची लहर येईल हे कुणीही सांगू शकत नाही. भारतासारख्या एवढ्या विशाल देशाचे राजकारण सांभाळणे हे काही सोपे काम नाही. पक्षकार्यासाठी त्यांनी दिवसाचे २४ तास दिले तरी अपुरे ठरतील एवढ्या जबाबदारीचे कॉंग्रेसाध्यक्षपद आहे आणि ते त्या पदाला न्याय देऊ शकत नाहीत हे आता निर्णायकपणे सिध्द झाले आहे. पण कुणी तसे हिमतीने बोलत नाही.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाने म्हणजेच सोनियांनी प्रियंका यांचे नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना सरचिटणिसपद देण्यात आले. उत्तर प्रदेशाची जबाबदारीही सोपविण्यात आली. पण एक तर राजकारण हा पूर्ण वेळेचा अतिशय धकाधकीचा मामला आहे. त्यात टिकण्यासाठी वेगळी जीवनशैली स्वीकारावी लागते. प्रियंकाच्या अंगवळणी आतापर्यंत पडलेली जीवनशैली त्यात कुठेच बसत नाही. त्यातच ‘कन्याराशी स्थितोनित्यम जामाता: दशमो ग्रह’ या संस्कृत उक्तीनुसार रॉबर्ट वाड्रा हा वादग्रस्त उद्योेगपती प्रियंकाच्या राशीला आला. त्यामुळे फक्त इंदिरा गांधींसारख्या दिसतात म्हणून लोक त्यांना स्वीकारतील अशी शक्यता नाही, पण सामान्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य एवढे खालावले आहे की, स्वतच्या बळावर आपण काही करुन दाखवू असा विश्वासच त्यांच्यात उरलेला नाही. त्यामुळे ते गांधी परिवाराच्या पलीकडे पाहूही शकत नाहीत. अशा विचित्र कोंडीत पक्ष सापडलेला असतांना आता पुन्हा राहुलचेच पाय धरण्याची पाळी पक्षावर येत आहे असे दिसते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुलने अध्यक्षपद भलेही सोडले असेल, पण ते केवळ नावापुरतेच. मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीनंतर तेथील नेतृत्वाचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न राहुलच्या निवासावरूनच होत होते. पक्षाचा कोणताही निर्णय त्यांच्या संमतीशिवाय होतच नव्हता. अगदी परवा महाराष्ट्रात झालेले सत्तापरिवर्तनही त्याला अपवाद नाही. लोकसभेत ते मधल्या बाकांवर बसतात. सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याची त्यांना सवयच नाही. एखादा नियम सांगून एखादा प्रश्न त्यांनी सांसदीय कामकाजात उपस्थित केला असेल हे पत्रकारांनाही आठवणार नाही. फक्त त्यांनी आपल्या जागेवरुन उठून जाऊन पंतप्रधानांना मिठी मारण्याचा व त्यानंतर डोळा मारण्याचा बालीश व हास्यास्पद प्रयत्न मात्र सर्वाना आठवतो. मोदींनी समाजमाध्यमांवरील आपल्या अनुपस्थितीबाबत विशिष्ट संकेत दिला. पण त्याचा सखोल विचार न करताच ‘मोदींनी विद्वेषाचा (नफरत) त्याग करावा’ असा तिरकस सल्ला देऊन राहुल मोकळे झाले. राफेल प्रकरणी त्यांनी किती आदळआपट केली, पण शेवटी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्याची पाळी कुणावर आली, हेही त्यांना आठवत नसावे. न्यायाधीश लोया यांच्या मृत्युप्रकरणाचा उल्लेख करायला तर ते कधीच चुकत नाहीत. पण त्यावेळी त्यांना सर्वोच्च न्यायालयानेच तो विषय निकालात काढला, हे त्यांच्या गावीही नसते. मोदींनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘लिहिलेल्या कागदाचा आधार न घेता एखाद्या विषयावर सलग दहा मिनिटे बोलण्याचे’ आव्हान दिले होते, जे ते स्वीकारु शकले नाहीत.सातत्याचा आणि त्यांचा तर संबंधच नाही. कधी ते मुस्लिम समाजाचे मसीहा बनल्याचा आव आणतात तर कधी मंदिरांच्या पायर्‍या झिजवून ‘जनेऊधारी ब्राम्हण असल्याचे सांगत असतात. पण ते काहीही असले तरी पक्षाला राहुलशिवाय पर्याय नाही असे मानणारे लोक त्यांच्याभोवती गोंडा घोळत असतात व त्याचीच चिन्हे आता दिसू लागली आहेत. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात अल्पसंख्यक समाजाला चेतविण्याचे त्यांनी केलेले कामच पक्षाला तारु शकेल अशी भावना असलेला मोठा वर्ग कॉंग्रेस पक्षात आहे. ज्या पध्दतीने प्रसारमाध्यमेही त्यांनाच उचलून धरतात ते पाहता कॉंग्रेसला अजूनही राहुलशिवाय पर्याय नाही, असे वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यकाळात कॉंग्रेसचे अध्यक्षपद त्यांच्याकडे पुन्हा आले तर ते आश्चर्य ठरणार नाही.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

काळजी घ्या

गोमंतकाचा प्रिय उत्सव गणेशोत्सव आता दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोना महामारीचे सावट असले तरीही गतवर्षीप्रमाणेच यंदाही जमेल त्या परीने त्याच्या स्वागताची...

मोरजीत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

>> अमेरिकन नागरिकांना धमकी देऊन लुटण्याचा प्रकार >> गुन्हे अन्वेषण व सायबर गुन्हे विभागाची कारवाई गोवा...

कोरोनाने चोवीस तासांत दोन मृत्यू, ८६ बाधित

कोरोनामुळे काल राज्यात दोघाजणांचा मृत्यू झाला. तर कोरोनाचा संसर्ग झालेले ८६ नवे रुग्ण राज्यभरात सापडले. तसेच गेल्या २४ तासांत राज्यात ८२ रुग्ण...

उसगावमधील अपघातात युवकाचा जागीच मृत्यू

धाटवाडा-उसगाव येथील एमआरएफ कंपनीसमोर राष्ट्रीय महामार्गावर काल बुधवारी पहाटे कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात उत्तम चक्रबहाद्दूर धामी (३०) हा युवक जागीच ठार...

देवेंद्र फडणवीस यांची गोवा भाजप प्रभारीपदी नियुक्ती

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी गोवा प्रभारी म्हणून...

ALSO IN THIS SECTION

आयएमएफचा वेधक अंदाज

हेमंत देसाई जागतिक नाणेनिधीने भारताचा जीडीपी दर साडेबारा टक्के तर चीनचा ८.६ टक्के असेल असा थेट अंदाज व्यक्त...

अलक्ष लागले दिवे

(‘नवप्रभा’ दिवाळी अंक- २०२० मध्ये प्रसिद्ध) डॉ. अनुजा जोशी(नामवंत कवयित्री) दिवे लागले रे दिवे लागले...

कोरोना संकटाचा पुढील टप्पा घातक

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) सध्या देशात कोरोनाची ही लागण स्टेज २ वर आली आहे. येथेच आळा घालण्यात अपयश आले तर, तिचा पुढील प्रसार रोखण्यासाठी...

कोविड-१९ ला अटकाव करायचा कसा?

अमिताभ कांत आणि ऋचा रश्मी या आजारामुळे शहरी अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि देशाच्या जीडीपीमध्ये शहरे महत्त्वाचे योगदान देतात हे नाकारता येणार नाही....

चीन संकटात, भारताला संधी

शैलेंद्र देवळणकर कोरोना विषाणूच्या हाहाकारामुळे चीनचे अर्थकारण पूर्णतः कोलमडून गेले आहे. चीन हे जगाचे मॅन्युङ्गॅक्चरिंग हब असल्यामुळे जगालाही याचा मोठा ङ्गटका बसला आहे. कारण...