Home बातम्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी समर्पित जीवन : इंदिरा गांधी

राष्ट्रीय एकात्मतेसाठी समर्पित जीवन : इंदिरा गांधी

0

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव

भारताच्या पंतप्रधान आणि अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष म्हणून श्रीमती इंदिरा गांधी यांनी जे योगदान दिलेले आहे, ते पाहता विरोधकांनीही मान्य केले पाहिजे की, हे व्यक्तिमत्त्व म्हणजे राष्ट्रीय एकात्मता व गोरगरीब अशा तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी समर्पित असे जीवन जगलेल्या त्या वीरांगना होत्या.

पंतप्रधानपदाची सूत्रे ग्रहण केल्यानंतर त्यांनी दोन गोष्टी प्रकर्षाने देशवासीयांपुढे मांडल्या होत्या. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे ‘भारत म्हणजे केवळ भूमीचा विस्तार नाही. भारत म्हणजे सहिष्णुता, दया आणि मैत्री होय. विविधतेतील एकात्मतेवर भारताचा विश्वास आहे. तो सर्व जातीधर्माच्या लोकांपर्यंत पोचवला गेला पाहिजे!

त्यांनी दुसरी गोष्ट आवर्जून सांगितली, ती म्हणजे ‘‘आपल्या एकात्मतेला कमकुवत करणार्‍या प्रत्येक घटकाची आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्या विशाल आणि वैविध्यपूर्ण देशामध्ये हे कार्य कसे करावे, याबद्दल आपल्याला एक सविस्तर राष्ट्रीय सर्वानुमतीची आवश्यकता आहे. कोणत्याही संकुचित फायद्यांना आणि दुफळीच्या भावनांना प्रोत्साहन देणार्‍या कल्पना, घडामोडी, व्यवहार आणि उपाय यावर नियंत्रण आणि त्यांचे खच्चीकरण आवश्यक आहे. ही केवळ कायद्याची बाब आहे असे समजता कामा नये. आपल्याकडे पुरेसे कायदे आहेत हे खरे, पण आपल्याला असे आढळून आले आहे की, आपण कितीही कायदे केले तरी त्यात पळवाटा शोधून काढता येतातच. हा प्रश्न आहे विशाल राजकीय निवाड्याचा आणि मानसिक भूमिकेचा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विभिन्न क्षेत्रातील कृती. यामध्ये प्रामुख्याने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रसारमाध्यमे यांचा समावेश करता येईल.

प्रत्येकाला माणूस म्हणून जसा जगण्याचा हक्क आहे, तसेच त्याला अन्न, वस्त्र व निवारा अपरिहार्य आहे. गरिबांतल्या गरीब माणसाला जोपर्यंत रोटी, कपडा और मकान याची उपलब्धी होत नाही, तोपर्यंत तरी तरी येथे खर्‍या अर्थाने शांती नांदू शकणार नाही. इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत गाजलेला वीस कलमी कार्यक्रम हा त्याचा पाया होता. या पायाचा भक्कम आधार घेत देशातील असंख्य निराधार शंभर चौरस मीटरच्या जागेत सरकारी अनुदानातून आपले घर उभारू शकले. असंख्य बेरोजगारांना दोन वेळच्या जेवणाची सोय झाली. असंख्य लोक खादीचे किंवा कमी किंमतीचे सुती कपडे घालून उन्हापासून, पावसापासून, थंडीपासून स्वतःचे रक्षण करू शकले.

आपला देश सर्वधर्मसमभाव मानणारा देश आहे व हे जगापुढे आदर्श असे उदाहरण आहे असे सांगताना त्या म्हणत, ‘‘भारत हिंदूंचा आणि मुसलमानांचा, ख्रिश्‍चनांचा आणि शिखांचा, बौद्धांचा आणि जैनांचा, पारश्यांचा आणि इतरांचाही असा सर्वांचा देश आहे. आणि म्हणून येथे सर्वांनाच समान हक्क आणि समान आदर आणि संरक्षण मिळायला हवे.’’ त्या असे बोलून थांबल्या नाहीत, तर भारतभर जेव्हा जेव्हा त्यांनी दौरे केले, तेव्हा तेथील पक्षजनांना, राज्यप्रमुखांना हे वारंवार सांगितले. एका शीख समाजाच्या व्यक्तीने त्यांची हत्या केली, पण या समाजाबद्दल त्यांना काय वाटत होते, ते जाणून घेणे उद्बोधक ठरेल. त्या म्हणत, ‘‘विभिन्न धर्मांच्या लोकांना एकत्र आणण्याच्या भावनेतूच तर शीख धर्माचा उदय झालेला आहे. गुरू नानक यांचे जीवन सहिष्णुतेचे प्रतीक आहे. त्या महान गुरूंनी प्रेम आणि बंधुभाव यांची शिकवण जगाला दिली. सत्य आणि दया हे हे ग्रंथसाहिबाचे ब्रीद आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्याला इतक्या मोठ्या व गौरवपूर्ण काळात पंजाबमधील शीखांनी हातभार लावला आहे. शीख धर्म ज्या सांस्कृतिक तत्त्वांसाठी ओळखला जातो, त्यांची शिखांच्याच एका छोट्या अल्पसंख्यक गटाकडून पायमल्ली होऊ देऊ नका.’’ पण दुर्दैव असे की शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपण देश व देशवासीयांसाठी कार्यरत राहू म्हणणार्‍या इंदिराजींची हत्या करून त्या शूर व देशभक्त जमातीला काळीमा फासण्याचे कुकर्म घडले. देवा त्यांना क्षमा कर असे म्हणण्याखेरीज आपल्या हाती तरी काय आहे?

१९७५ मध्ये जेव्हा इंदिराजींनी वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला, तेव्हा त्यांनी जाहीर सूचना केली होती की आपण चमत्कारांची अपेक्षा ठेवून चालणार नाही. गरीबी हटवायची असेल तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की, शुद्ध हेतू आणि अनुशासन यांच्या मदतीने केलेले परिश्रमच फलद्रुप ठरतील. आपले राष्ट्रीय ब्रिदवाक्य आहे, ते म्हणजे सत्यमेव जयते! केवळ सत्याचाच विजय होतो. आपल्या दैनंदिन जीवनात आपण आणखी एक ब्रिदवाक्य समोर ठेवूया, ते म्हणजे ‘श्रम एव जयते’ आदर, प्रगती आणि उत्कर्ष यांचा मूळ पाया म्हणजे सत्याला वाहून घेणे आणि परिश्रम हे होय!

आणीबाणीच्या काळात अनेक नामवंतांनी त्यांची साथ सोडली. त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले हे खरे असले, तरी देशाप्रती व देशबांधवांप्रती त्यांना खरे प्रेम, खरी तळमळ व खरी कळकळ असल्यामुळेच देशवासीयांनी त्यांना पुनश्च सत्तारूढ केले. मुकी बाहुली म्हणून हिणवणार्‍या विरोधकांनाही आपण रणरागिणी कशी आहोत, हे पटवून देणार्‍या त्यांच्या स्मृतींस विनम्र अभिवादन!