भारत सरकारच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून अमेरिका दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते शशी थरूर यांनी गुरुवारी पक्षविरोधी वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. जे लोक राष्ट्रीय हितासाठी काम करणे पक्षविरोधी कृती मानतात, त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. राष्ट्रहितासाठी काम करणे म्हणजे पक्षविरोधी कृती नव्हे त्यांनी जाणले पाहिजे, असे थरुर म्हणाले. काँग्रेस नेते उदित राज यांनी केंद्र सरकारच्या समर्थनार्थ बोलल्याबद्दल थरूर यांना ‘भाजपचे सुपर प्रवक्ता’ म्हटले होते, त्या टीकेला थरुर यांनी उत्तर दिले. काँग्रेस सोडण्याच्या चर्चेच्या प्रश्नावरही थरूर यांनी भाष्य केले. जेव्हा तुम्ही देशाची सेवा करत असता तेव्हा अशा गोष्टींबद्दल जास्त काळजी करू नये. भारताच्या सीमेबाहेर जाताच आमचे राजकीय मतभेद संपतात. सीमा ओलांडताच, आम्ही प्रथम भारतीय आहोत, असे थरुर म्हणाले. थरूर हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत, जिथे ते ऑपरेशन सिंदूरवर बहुपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत-पाकिस्तानमधील मध्यस्थीच्या विधानावर थरूर म्हणाले, मी येथे कोणत्याही वादाला खतपाणी घालण्यासाठी आलो नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा आदर केला जातो. त्यांनी पाकला काय म्हटले हे आम्हाला माहिती नाही, परंतु आम्हाला कोणाच्याही सल्ल्याची गरज नव्हती, असे थरुर म्हणाले.