येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेस पक्षाकडे १२ जागांची मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरेंद्र सिरसाट यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
थिवी, म्हापसा, साळगाव, शिवोली, बाणावली, वास्को, डिचोली, पर्वरी, कुठ्ठाळी, मांद्रे, काणकोण या मतदारसंघात पक्षाचे प्राबल्य असून या मतदारसंघांत राष्ट्रवादीला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सिरसाट यांनी स्पष्ट केले.
शनिवार दि. १५ रोजी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे ते म्हणाले. २०१२–१२ वर्षासाठी पक्षाच्या विविध समित्यांची स्थापना करण्याचा तसेच सदस्य नोंदणी मोहीम हाती घेण्याबाबतही निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला पक्षाचे आमदार व पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर, पक्षाचे नेते व माजी मंत्री सुरेश परुळेकर, अविनाश भोसले, राजन घाटे आदी उपस्थित होते.