28 C
Panjim
Monday, September 28, 2020

राष्ट्रभाषा दिवस

  • मीना समुद्र

अनेक वैचित्र्ये, विविधता, सौंदर्य, माधुर्य, नम्रता, संपन्नता असलेली ही गुणवती त्यामुळेच हिंदुस्थानची राष्ट्रभाषा म्हणून पात्र ठरली. भारताच्या सांस्कृतिक संचिताचा, भौगोलिक वैशिष्ट्यांचा आणि ऐतिहासिकतेचा ठसा उमटवणार्‍या या भाषेच्या गौरवदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!

उद्या १४ सप्टेंबर. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला तो ७०-७१ वर्षांपूर्वी याच दिवशी. त्यामुळे हा आपल्या राष्ट्रभाषेचा स्थापनादिन आणि तिचा गौरवदिनही. म्हणूनच हा दिवस आपण ‘हिंदी-दिन’ म्हणून साजरा करतो. पुढे ८-१५ दिवस हा गौरवसोहळा वक्तृत्व, कविता, नाटकं, निबंधस्पर्धा अशा वेगवेगळ्या रूपात साजरा होतो.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळाने म्हणजे १९४९ साली देशाच्या घटनेने हिंदीला ‘राष्ट्रभाषा’ म्हणून मान्यता दिली आणि देवनागरीला तिची लिपी म्हणून मान्यता मिळाली. त्यावेळचे अतिशय विद्वान राज्यकर्ते आणि लोकनेते राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी या सार्‍यांचे याबाबतीतले योगदान अतिशय मोलाचे होते हे निःसंशय! जबलपूर येथे भरलेल्या ‘सप्तम्’ हिंदी साहित्यसंमेलनात व्यासपीठावरील प्रतिनिधींनी ‘हिंदी राष्ट्रभाषे’ची घोषणा दिली. अर्थात कुठलीही भाषा ही नुसती ‘राष्ट्रभाषा’ म्हणून जाहीर करून किंवा तिची फक्त घोषणा देऊन चालत नाही तर ती जनमान्य होण्यासाठी तिचा प्रचार आणि प्रसार करणे आवश्यक असते. ती जनमानसात पक्की रुजावी लागते, रुतावी लागते; मुरावी लागते. वेगवेगळ्या प्रकारांनी तिचे रूपरंग लोकांनी आपलेसे करावे लागते. त्यासाठी तिच्यातले गुण मनावर ठसवावे लागतात. त्यासाठी हरप्रकारे अथक प्रयत्न करावे लागतात, परिश्रम करावे लागतात.

पुढे महात्मा गांधींनी आपला पाठिंबा दिला आणि सक्रीय सहाय्यही केले. त्यामुळे भारतात ठिकठिकाणच्या अहिंदी भाषिक प्रदेशांत राष्ट्रभाषा समित्यांची स्थापना झाली. त्याबरोबरच राष्ट्रभाषा प्रचारकेंद्रेही स्थापन करण्यात आली. देशाची अधिकृत राष्ट्रभाषा झाल्यामुळे शाळा, महाविद्यालये आणि सदर कार्यालयांतही ती कामांसाठी अनिवार्य केली गेली. त्यामुळे ती येत नसल्यास शिकणे आणि वापरणेही जरूरीचे झाले. मला आठवते त्यानुसार ६० ते ७० च्या दशकात व त्यापूर्वीही राष्ट्रभाषा प्रसारणीचा जोर होता. तेव्हा राष्ट्रभाषा पहिली, दुसरी, प्रबोध, प्रवीण, पंडित आणि रत्न अशा परीक्षा असत. बहुसंख्य मुले परीक्षांना बसत. त्याचे सर्टिफिकेट मिळे. शाळांतूनही उत्तेजन असे. हिंदी-शिकवणीवर्गही चालत. महाविद्यालयात बी.ए.ला हिंदी खास विषय घेण्याच्या अटीवर एफ.वाय; एस.वाय. आणि टी.वाय.साठी त्यावेळच्या मानाने घसघशीत रकमेची शिष्यवृत्ती किंवा अभ्यासवृत्ती असे. अगदी सुबोध हिंदीपासून ते परिपूर्ण अशा विषयांचे लेखकांचे लेखन, कथा, कादंबर्‍या, एकांकिका, नाटकं अशा तर्‍हेने नटलेली ही साहित्यसंपदा. त्यामुळे हिंदीतील समृद्ध साहित्याचा प्रेरणादायक आस्वाद घेता येई. आजही हे प्रसारकार्य चालू आहे. हिंदी भाषेचा लळा लागला तो असा विद्यार्थिजीवनापासूनच.

तसा भाषा हा अतिशय संवेदनशील विषय. त्यातून भारता हा खंडप्राय देश. त्यातले विविध प्रांत आणि त्या अनेक प्रांतांत बोलल्या जाणार्‍या वेगवेगळ्या भाषा आणि त्यांच्या वेगवेगळ्या बोली. सीमाप्रांतात दोन भाषा आणि बोलींची सरमिसळ झालेली. कर्नाटकात कन्नड, महाराष्ट्रात मराठी, गुजराथेत गुजराथी, आंध्रात तेलगू, केरळात मल्याळम् अशा भाषा आणि बोलींच्या वैविध्यात कोणतीतरी एक भाषा ठरवणे हे अतिशय गुंतागुंतीचे आणि कठीण काम होते. कारण प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असतो. तिच्याबद्दल अत्यंत जिव्हाळा आणि आपुलकी असते. त्यामुळे आपलीच भाषा सर्वश्रेष्ठ असे वाटणे साहजिक आणि सहज स्वाभाविक असते. त्यामुळे जाणूनबुजून दुसर्‍या भाषेचा अवलंब केला जात असेल तर तिथे आपल्या भाषेची पायमल्ली होते आहे; तिचा अवमान, अपमान होतो आहे असे वाटून तो एक संघर्षाचा विषय बनतो. यातून सामंजस्याने वाट काढणे हे मोठेच जबाबदारीचे आणि कठीण काम असते. पूर्वी भारताची संस्कृती आणि संपन्न वारसा जगापुढे ठेवू शकेल अशी भाषा म्हणजे संस्कृत भाषा.

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाणभारती
ततोऽपि मधुरं काव्यं तस्मादपि सुभाषितम्
अशा शब्दांत तिचा गौरव होतो. ती आपली अत्यंत प्राचीन, ऋषिमुनी, संतांची भाषा आहे. ती वेदवाणी आहे. एकेकाळी ती भाषा बोलणारी, लिहिणारी, कळणारी माणसे होती. पण आघातयुक्त उच्चार, लांबच लांब सामासिक शब्द, पल्लेदार वाक्ये आणि तिच्यातले व्याकरण काठिण्य (मृदू असूनही, सौंदर्य असूनही) जनसामान्यापर्यंत ती पोचलीच नाही. त्यामुळे तिचे सामाजिक अभिसरण न झाल्याने ती काळाच्या प्रवाहात स्थान हरवू लागली. तिच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न आज अनेक आघाड्यांवर सुरू असले तरी ती राष्ट्रभाषा म्हणून पुढे आली नाही. ब्रिटिशांच्या अमलाखाली फोफावलेली इंग्रजी ही परकीयच! जगाची ज्ञानभाषा असली तरी भारतीय संस्कृतिसंचित तिच्यात नाही.

चीनची चिनी, पोर्तुगालची पोर्तुगीज, रशियाची रशियन, जपानची जपानी अशी स्वतंत्र भारताचीही एक भाषा असावी असे भारतीयांना वाटणे अत्यंत साहजिक होते; कारण भाषा हे माणसामाणसाला जोडण्याचे साधन असते. व्यक्ती, समाज यांना व्यक्त होण्याचे ते माध्यम असते. समान भाषेद्वारे आपल्याच देशातील प्रांतांत संवादसुकरताही साध्य होते. अनेक सामाजिक समस्या समजून घेणे, त्यावर उपाय शोधणे सोपे जाते. कारण विचार-विनिमयाचे भाषा हे एक साधन असते आणि ते सामोपचाराने करण्याचा तो सुलभ मार्ग असतो. तो देशाचा चेहराही असतो आणि अंतःकरणाचं प्रतिबिंब दाखविणारा आरसाही. म्हणूनच राष्ट्रभाषेची निवड करताना काही निकष लावले गेले ते म्हणजे ती भाषा बोलणार्‍या भाषिकांची संख्या जास्त हवी आणि ती शिकायला आणि समजायला सोपी हवी. हिंदी ही भारतातील बहुसंख्यकांची भाषा आहे. ती समजायला सोपी, सरळ, सुबोध, ऋजू, मृदू, आर्जवी, विनम्र, अदबशीर आहे. संस्कृतोद्भव असल्याने मराठी, बंगाली अशा अनेक भाषाभगिनींशी तिचे साम्य आहे. संस्कृत, मराठी, बंगालीना देवनागरी ही पूर्वपरिचित अशी लिपी आहे. प्रांतिक भाषांशी ती हातमिळवणी करू शकते. हिंदीतल्या उर्दूमिश्रित शेरोशायरीशी, शास्त्रीय गाण्यांशी, सिनेसंगीताशी- सर्वांचीच परिचय आहे. संत रहीम, कबीराचे दोहे, सूरपदावली, सुलसीरामायण, मीराभजने, नामदेव भजन-कीर्तने, गुरुबानी असे सारे आपल्याला खूप भावणारे आहे. प्रेमचंद, कृष्णवर्मा, भीष्म साहनी, महादेवी वर्मा, सुभद्राकुमारी चौहान, सुमित्रानंदन पंत, जयशंकर प्रसाद, नीरज आणि असंख्य दिग्गज लेखक-कवींनी, कादंबरीकार आणि कथाकारांनी हिंदी साहित्य समृद्ध आहे. हिंदी नाटके, एकांकिका, विनोद अशांनी ते बहरत राहिले आहे. हरियाणवी, कनौजी, मैथिली, व्रज, भोजपुरी, अवधी, खडीबोली, मैथिली, छत्तीसगढी अशा वेगवेगळ्या ढंगात आणि बाजात ती प्रकट होते तेव्हा त्या-त्या बोलीची नादमधुरता घेऊन येते. अनेक वैचित्र्ये, विविधता, सौंदर्य, माधुर्य, नम्रता, संपन्नता असलेली ही गुणवती त्यामुळेच हिंदुस्थानची राष्ट्रभाषा म्हणून पात्र ठरली. भारताच्या सांस्कृतिक संचिताचा, भौगोलिक वैशिष्ट्यांचा आणि ऐतिहासिकतेचा ठसा उमटवणार्‍या या भाषेच्या गौरवदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

संत मोहनदास

ऍड. रमाकांत खलप अशा या संताची १५० वी जयंती २ ऑक्टोबर २०२० रोजी जगभर साजरी केली जाईल. सत्याग्रह...

ततो युद्धाय युज्यस्व…

मीना समुद्र कोरोनाचे संकट हे पूर्णपणे माणसाने आपल्या करणीमुळे ओढवून घेतलेले आहे. स्वतःच्या स्वार्थापायी आणि भोगवादी, चंगळवादी, बेदरकार...

सृष्टीच्या रहस्याचा वेध

डॉ. सोमनाथ कोमरपंत रूढार्थाने हे क्रमिक पुस्तक नसून त्याचे उद्दिष्ट काहीसे निराळे आहे. विद्यार्थ्यांना काव्यमाधुरी स्वतंत्र चाखता यावी;...

आश्विन

पौर्णिमा केरकर भातकापणी करून ती पेंडके खळ्यावर तर कधी घराच्या पडवीत आडवी करून ठेवली जायची. त्यावेळी आश्विन घरात...

ALSO IN THIS SECTION

संत मोहनदास

ऍड. रमाकांत खलप अशा या संताची १५० वी जयंती २ ऑक्टोबर २०२० रोजी जगभर साजरी केली जाईल. सत्याग्रह...

ततो युद्धाय युज्यस्व…

मीना समुद्र कोरोनाचे संकट हे पूर्णपणे माणसाने आपल्या करणीमुळे ओढवून घेतलेले आहे. स्वतःच्या स्वार्थापायी आणि भोगवादी, चंगळवादी, बेदरकार...

सृष्टीच्या रहस्याचा वेध

डॉ. सोमनाथ कोमरपंत रूढार्थाने हे क्रमिक पुस्तक नसून त्याचे उद्दिष्ट काहीसे निराळे आहे. विद्यार्थ्यांना काव्यमाधुरी स्वतंत्र चाखता यावी;...

आश्विन

पौर्णिमा केरकर भातकापणी करून ती पेंडके खळ्यावर तर कधी घराच्या पडवीत आडवी करून ठेवली जायची. त्यावेळी आश्विन घरात...