राष्ट्रपतीपदासाठी ९९.१८ टक्के मतदान

0
16

>> गोव्यात १०० टक्के मतदान

>> २१ रोजी निकाल, २५ रोजी शपथविधी

राष्ट्रपतीपदासाठी काल सोमवारी निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पडली. संसदेतील ९९.१८ टक्के खासदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. या निवडणुकीमध्ये एनडीएच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जवळपास ४८०० खासदार आणि आमदारांनी मतदान केले. देशभरातल्या ४०२५ आमदारांपैकी ३९९१ आमदारांनी आणि तर ७७१ खासदारांपैकी ७६३ खासदारांनी मतदान केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास, तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संध्याकाळी चार वाजता तर कॉंग्रेस आमदार राहुल गांधी यांनी पावणेचार वाजता संसदेमध्ये आपल्या मतदानाचा अधिकार बजावला.
दरम्यान, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, समाजवादी पक्षाच्या आमदारांकडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार मुर्मू यांना मतदान केल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल २१ जुलै रोजी लागणार आहे तर २५ जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल.

गोव्यात १००% मतदान

राष्ट्रपती निवडणुकीसाठी राज्यातील सर्व आमदारांनी मतदान काल केले. राज्यातील विरोधी पक्षातील काही मते रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मिळण्याची शक्यता व्यक्ती केली जात असल्याने आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांतर्फे यशवंत सिन्हा हे उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहेत.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी पर्वरी येथील गोवा विधानसभा संकुलात मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, इतर मंत्री आणि सर्व आमदारांनी मतदान केले. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सर्वप्रथम मतदान केले.
राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना २५ पेक्षा जास्त मते मिळतील. आपण सर्व आमदारांना रालोआच्या उमेदवार मुर्मू यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रपती निवडणुकीत मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राष्ट्रपती निवडणुकीत क्रॉस मतदान होण्याची शक्यता आहे. कॉँग्रेस पक्षाच्या आमदारांचे दोन गट आहेत. एक गट सरकारच्या विरोधात असून दुसरा गट सरकारच्या बाजूने आहे, असा दावा गोवा ङ्गॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला.
राष्ट्रपती निवडणुकीत कॉँग्रेस पक्ष व्हीप जारी करू शकत नाही. प्रत्येकाला मतदान कोणाला करायचे याचे स्वातंत्र्य असते, असे कॉँग्रेसचे आमदार कार्लुस ङ्गेरेरा यांनी सांगितले.