रालोआला 11 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपतर्फे ‘संकल्प से सिद्धी’ उपक्रम

0
14

राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंतकुमार गौतम यांची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला 11 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गोवा प्रदेश भाजपकडून ‘संकल्प से सिद्धी’ या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती काल भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंतकुमार गौतम यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 26 मे 2025 रोजी सत्तेत 11 वर्षे पूर्ण केली असली तरी, पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाचा पहिला वर्धापन दिन भाजपतर्फे येत्या 9 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सर्व भाजपशासित राज्यांमध्ये पत्रकार परिषदांचे आयोजन केले जाणार आहे. या उपक्रमाखाली आयुष्मान भारत योजनेसारख्या विविध केंद्र पुरस्कृत योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी नोंदणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. भाजपची विशिष्ट कामगिरी दर्शविणारे समान कार्यक्रम आणि सादरीकरणे राज्य आणि जिल्हा पातळीवर 11 जूनपर्यंत सुरू राहतील, असे गौतम यांनी सांगितले.

तीन दिवस योगसत्रांची मालिका
पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते जनतेशी सक्रियपणे संवाद साधून केंद्र आणि राज्य भाजप सरकारच्या कामगिरी आणि कामगिरीची माहिती देणार आहेत. याशिवाय, 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर 17 ते 20 जून दरम्यान योग सत्रांची मालिका आयोजित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांची उपस्थिती होती.

कार्यशाळेचे आयोजन
मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त भाजप गोवा मुख्यालयात ‘संकल्प से सिद्धी’ या विषयावर काल कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंतकुमार गौतम, भाजप गोवा अध्यक्ष दामू नाईक, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, आमदार, भाजप पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.
कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकारच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला. विकसित भारत 2047 च्या महत्त्वाकांक्षी स्वप्नाला साकार करण्यासाठी आणि प्रगतिशील, विकसित गोवाच्या आराखड्यावर चर्चा करण्यात आली.