रायबंदर ते चोडण जलमार्गावर महिनाभरात रो-रो फेरीबोट सेवा

0
13

>> नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाईंची माहिती; पर्यटक आणि चारचाकी वाहनांसाठी शुल्क आकारले जाणार

रायबंदर ते चोडण या जलमार्गावर रो-रो फेरीबोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून, महिनाभरात सर्व प्रक्रिया पूर्ण करून सेवा नियमित केली जाणार आहे, अशी माहिती नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल दिली.

रो-रो फेरीबोटच्या बांधकामासाठी सरकारने कोणताही खर्च केलेला नाही. राज्य सरकारकडून सदर रो-रो फेरीबोट चालविण्यासाठी घेतल्या जाणार आहेत. पर्यटन वृद्धीसाठी या रो-रो फेरीबोटींचा वापर केला जाणार आहे. चारचाकी वाहनांसाठी शुल्क आकारले जाणार आहे. जलमार्गावरील नियमित प्रवासी आणि बेटावरील नागरिकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तथापि, पर्यटक व इतरांसाठी शुल्क लागू करण्यावर विचार केला जाणार आहे. रो-रो फेरीबोट चालविण्यासाठी नदी परिवहन खात्याच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले.

रो-रो फेरीबोट सेवेची चाचणी सुरू
रायबंदर ते चोडण जलमार्गावर बहुप्रतिक्षीत रो-रो फेरीबोट सेवेची चाचणी कालपासून सुरू करण्यात आली. रो-रो फेरीबोट सेवा गेल्या मार्च महिन्यापासून सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. तथापि, विविध कारणांमुळे ह्या सेवेला विलंब झाला. राज्य सरकारने नवीन दोन रो-रो फेरीबोट उपलब्ध केल्या आहेत. सुरूवातीला रो-रो फेरीबोटीची कुठ्ठाळी येथील जलमार्गावर चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर, आता रायबंदर ते चोडण या प्रमुख जलमार्गावर चाचणी सेवा सुरू करण्यात आली आहे. रो-रो फेरीबोटमध्ये प्रत्येक ट्रिपमध्ये 15 हून अधिक चार चाकी वाहने आणि तितक्याच संख्येने दुचाकी नेली जाऊ शकतात. प्रवाशांसाठी बसण्यासाठी वेगळी व्यवस्था उपलब्ध आहे. रो-रो फेरीबोटमध्ये वाहने एका बाजूने आतमध्ये घेण्याची आणि दुसऱ्या बाजूने वाहने बाहेर नेण्याची सुविधा उपलब्ध असल्याने वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे.