10 जणांना अटक, 28 लाखांचा ऐवज जप्त
गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने रायबंदर आणि कदंब पठार (जुने गोवा) येथे छापे टाकून ऑनलाइन आयपीएल सट्टेबाजीच्या दोन प्रकरणांचा गुरुवारी मध्यरात्री पर्दाफाश केला.
या कारवाईत एकूण 10 जणांना अटक करण्यात आली असून सुमारे 28 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये 95 मोबाईल फोन, 8 लॅपटॉप, 77 सिमकार्ड आणि 18 डेबिट कार्डांचा समावेश आहे.
गुन्हा अन्वेषण विभागाला रायबंदर येथील एका रेसिडेन्सीतील व्हिलामध्ये सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून 8 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 48 मोबाईल फोन, 4 लॅपटॉप, 28 सिमकार्ड, 18 डेबिट कार्ड, विविध बँकांची धनादेश पुस्तिका, पासबुक, वाय-फाय रिसीव्हर बोर्ड आणि 2 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले.या प्रकरणात दिग्विजय देवांगन (29, छत्तीसगड), मनीष सोहनियल सुर्होता (21, हरियाणा), समीर श्यामलाल (20, हरियाणा), गौतम जगपाल सिंग परितुर (28, उत्तर प्रदेश), ध्रुव विजय सियाववानी (20, मध्य प्रदेश), कमलसिंग बिरायण (22, छत्तीसगड), भूपेंद्र सिंग योगेश पाईकरा (20, छत्तीसगड) आणि करण चौहान (20, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, कदंब पठार-जुने गोवा येथील दुसऱ्या व्हिलामध्येही ऑनलाइन सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून आणखी 2 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 47 मोबाईल फोन, 4 लॅपटॉप, 1 टॅब, 49 सिमकार्ड, 1 टीव्ही आणि 7 पासबुक जप्त करण्यात आले.या प्रकरणात लकी संतोष कश्यप (27, जबलपूर, मध्य प्रदेश) आणि करण विजय आर्यन (29, जबलपूर, मध्य प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी सट्टेबाजीसाठी ‘रेड्डी888′ आणि ‘फेअरप्ले’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करत होते. या प्लॅटफॉर्मवर लावलेल्या बेट्ससाठी पे-इन व पे-आउटचे व्यवस्थापन केले जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता (आयपीएस) यांनी दिली.

