26 C
Panjim
Thursday, December 3, 2020

रायझिंग स्टार शुभमन गिल

  • सुधाकर रामचंद्र नाईक

संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या ‘इंडियन प्रिमियर लीग’मध्ये नैपुण्यकुशल भारतीय युवा क्रिकेटपटू आपली गुणवत्ता प्रगटवीत असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सीनियर सिलेक्शन कमिटीने नोव्हेंबरमध्ये होणार्‍या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात उमद्या खेळाडूंना संधी देत त्यांच्या कामगिरीची दखल घेतली आहे. टीम इंडियाची ‘ब्ल्यू जर्सी’ परिधान करणे हे प्रत्येक भारतीय युवा क्रिकेटपटूचे स्वप्न असते. आयसीसी विश्‍वचषकानंतर भारतीय संघात बर्‍याच नव्या खेळाडूंनी टीम इंडियात स्थान मिळविले असून राष्ट्रीय संघातील आपली जागा बळकट बनविण्यासाठी योग्यतम योगदान देणे गरजेचे आहे. ‘कोलकाता नाइटरायडर्स’चा सलामीवीर शुभमन गिलला न्यूझिलंडविरुद्धच्या मालिकेतील दौर्‍यात कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघातही स्थान मिळाले असून राहूल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या आराध्यांचा खेळ पाहात क्रिकेटकौशल्य विकसीत केलेला हा पंजाबचा नैपुण्यकुशल सलामीवीर या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न निश्‍चितपणे करील.

८ सप्टेंबर १९९९ रोजी फजिल्का, पंजाब येथे जन्मलेला शुभमन बालपणापासूनच क्रिकेटवेडा होता. वयाच्या तिसर्‍या वर्षी खेळण्यांनी खेळायच्या वयात शुभमन बॅट आणि बॉलच्या प्रेमात पडलेला. झोपतानाही त्याच्या कुशीला बॅट-बॉल असायचा. त्याचे वडील लखविंदर सिंग यांनाही क्रिकेटर बनायचे होते, पण त्यांना ते जमले नाही. पण मुलाचे उपजत गुण जाणून त्यांनी त्याला प्रोत्साहन दिले. फजिल्का येथे त्यांचा भरपूर जमीनजुमला आहे. छोट्या शुभमनची क्रिकेटची हौस पुरविण्यासाठी आपल्या शेतावरील कामगारांनाही त्याच्यासोबत खेळायला, बॉल टाकायला ते लावायचे. फजिल्का येथे क्रिकेट प्रशिक्षण सुविधा नसल्याने त्यांनी मोहाली येथे पीसीए स्टेडियमजवळ भाड्याने घर घेतले आणि त्याला योग्य प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. शुभमनने वडिलांच्या प्रोत्साहनाला योग्य न्याय देताना अकराव्या वर्षीच पंजाबच्या अंडर १६ संघात स्थान मिळविले. २०१४ मध्ये शुभमनने पंजाबच्या इंटर डिस्ट्रिक्ट एम. एल. मार्कन चषक अंडर १६ स्पर्धेत ३५१ धावा नोंदल्या, तसेच निर्मल सिंगच्या साथीत जिल्हास्तरावर ५८७ धावांची विक्रमी सलामीही दिली.

२०१३-१४ च्या मोसमातील यशस्वी कामगिरीसाठी ‘बीसीसीआय’ने शुभमनला सर्वश्रेष्ठ अंडर १६ खेळाडू म्हणून एम. ए. चिदंबरम् चषकाने गौरविले. २०१६-१७ या काळात शुभमनने विजय हजारे चषक स्पर्धेत शानदार पदार्पणात द्विशतक नोंदले. २०१७-१८ मधील मोसमात पंजाबतर्फे रणजी पदार्पण केलेल्या शुभमनने सेनादलाविरुद्धच्या दुसर्‍या रणजी सामन्यात आपले पहिले फर्स्ट क्लास शतक नोंदले.

२०१७ मधील इंग्लंडविरुद्धच्या अंडर १९ मालिकेतील विजेत्या भारतीय युवा संघाचा सदस्य असलेल्या शुभमनने एका वन-डे सामन्यात १४७ धावा नोंदवीत सामनावीर किताबही पटकावला होता. २०१८ मधील अंडर १९ विश्‍वचषक स्पर्धेत त्याला उपकर्णधारपद मिळाले आणि त्याने आपला योग्यतम ठसा उमटविताना भारताच्या चौथ्या विक्रमी अंडर १९ विश्‍वचषक अजिंक्यपदात प्रमुख योगदान देताना तिसर्‍या क्रमावर १२४.०० च्या सरासरीने ३७२ धावा नोंदवीत ‘प्लेयर ऑफ दी टुर्नांमेंट’ किताबही पटकावला. विशेष म्हणजे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीतील विजयात शुभमनने ‘मॅच विनिंग’ कामगिरीत नाबाद १०२ धावा चोपीत राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, सौरव गांगुली या ज्येष्ठ-श्रेष्ठ खेळाडूंकडून कौतुकाची थाप मिळविली.

स्थानिक क्रिकेटमधील प्रभावी कामगिरीवर ऑक्टोबर २०१८ मध्ये शुभमनची देवधर चषक स्पर्धेत इंडिया-सी संघात निवड झाली. शुभमने या प्रतियोगितेत आपली गुणवत्ता प्रगटविताना इंडिया-ए विरुद्धच्या अखेरच्या लीग सामन्यात आक्रमक शतक झळकवीत आपल्या संघाला अंतिम फेरीत नेले. २०१८ मधील रणजी चषक मोसमात तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात शुभमनने आपले पहिले फर्स्ट क्लास द्विशतक (२६८) नोंदले. २५ डिसेंबर २०१८ रोजी हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाबला चौथ्या दिवशी विजयासाठी ५७ षटकांत ३३८ धावांची गरज होती आणि शुभमनने एकहाती झुंज देत १५४ चेंडूत १४८ धावा चोपीत संघाला विजयपथावर नेले. पण अखेर पंजाबला ५७ षटकांत ८ बाद ३२४ पर्यंतच मजल गाठता आली आणि सामना अनिर्णित राहिला. २०१८-१९ मधील मोसमात पंजाबतर्फे पाच रणजी सामन्यांत सर्वाधिक ७२८ धावा नोंदलेलेल्या शुभमनने १ जानेवारी २०१९ पर्यंत प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये १४ डावांत ९९० धावा नोंदल्या होत्या. ऑगस्ट २०१९ मध्ये त्रिनिदाद अँड टोबॅगो येथे ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत शुभमनने वेस्ट इंडीज अ संघाविरुद्ध फर्स्ट क्लास सामन्यात द्विशतक (२०४) नोंदणारा भारताचा युवा फलंदाज बनण्याचा मान मिळविला. १९ वर्षे ३३४ दिवस या वयात शुभमनने हा पराक्रम नोंदवीत माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीरचा विक्रम मोडला.

२०१९-२० मधील दुलीप करंडक स्पर्धेंत शुभमनला इंडिया-सी संघाचे कर्णधारपद भूषविण्याचा मान मिळाला, तसेच याच मोसमातील देवधर चषक स्पर्धेत इंडिया-सी संघाचे कर्णधारपद मिळाले. २० वर्षे ५७ दिवस या वयात त्याने दुलीप करंडक स्पर्धेंत कर्णधारपद भूषवीत वीराट कोहलीचा (२१ वर्षे १२४ दिवस) विक्रम मोडला.

स्थानिक तसेच अंडर १९ विश्‍वचषकातील धवल कामगिरीवर २०१८ मधील आयपीएलमध्ये शुभमन गिलला बॉलिवूड स्टार शाहरूख खानच्या ‘कोलकाता नाइटरायडर्स’ने १.८ कोटींच्या बोलीवर फ्रँचाइजमध्ये घेतले. आयपीएलमध्ये पदार्पण वर्षातच आपला ठसा उमटविताना गिलने १३ सामन्यांत एका अर्धशतकासह २०३, २०१९ मध्ये १३ सामन्यांत ३ अर्धशतकांसह २९६ आणि विद्यमान प्रतियोगितेतील १४ सामन्यांत ३ अर्धशतकांसह ४४० धावा नोंदल्या आहेत. २०१९ मध्ये शुभमनला आयपीएलमधील ‘इमर्जिंग प्लेयर ऑफ दी टुर्नांमेंट’ किताबाने गौरविण्यात आले होते. सलग तीन मोसम ‘कोलकाता नाइटरायडर्स’चे प्रतिनिधित्व करणारा शुभमन ‘केकेआर’चा महत्त्वाचा घटक बनलेला आहे.

३१ जानेवारी २०१९ मध्ये न्यूझिलंडविरुद्ध सेडॉन पार्क, हॅमिल्टन येथील चौथ्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या शुभमनला आतापर्यंत दोन सामन्यांत केवळ १६ धावा जमविता आल्या. किशोरवयात राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता प्रगटविलेल्या शुभमनला आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाणे खणखणीत असल्याचे सिध्द करण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौरा ही नामी संधी असून या संधीचे हा युवा खेळाडू निश्‍चितच सोने करील अशी आशा बाळगूया!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

खाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री

>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...

शाळा सुरू करताना…

विलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...

पीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड

शशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...

दुरपती

पौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...

कार्तिकातला दीपराग

मीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...

ALSO IN THIS SECTION

शाळा सुरू करताना…

विलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...

पीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड

शशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...

दुरपती

पौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...

कार्तिकातला दीपराग

मीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...

कर्तव्यनिष्ठ डॉ. मृदुला सिन्हा

ज्योती कुंकळ्ळकर साहित्य, संस्कृती आणि राजकारण या क्षेत्रांत स्वतःला झोकून घेणार्‍या गोव्याच्या माजी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा आज...