राम मंदिर देणगी घोटाळ्याची चौकशीसर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली व्हावी

0
9

काँग्रेसच्या रजनी पाटील यांची मागणी

अयोध्या येथे राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातील जनतेने देणगीच्या रूपात दिलेल्या कोट्यवधी रूपयांचा जो घोटाळा झालेला आहे त्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी केली जावी, अशी मागणी काल काँग्रेस पक्षाने पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. राम मंदिर ट्रस्टवरील भाजप, विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यानी हा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप काल पत्रकार परिषदेतून बोलताना काँग्रेसच्या माजी खासदार व पक्षाच्या अखिल भारतीय समितीच्या हिमाचल प्रदेश व चंदीगडच्या प्रभारी रजनी पाटील यांनी वरील आरोप केला.

हा मोठा घोटाळा असून यात मोठ्या माशांचा हात आहे. त्यामुळे ऐऱ्यागैऱ्यांना अटक करून भाजप सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसू नयेत, अशी मागणी पाटील यांनी यावेळी बोलताना केली. अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी सामान्यांतल्या सामान्य लोकानी देणग्या दिल्या होत्या. काँग्रेसवाल्यांनीही पैसे दिले असल्याचा दावा त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपच्या अन्य मोठ्या नेत्यांनी या प्रश्नी मौन का बाळगले आहे, असा सवालही पाटील यांनी यावेळी बोलताना केला. या घोटाळ्यात नेमका कोणाचा हात आहे त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी, अशी मागणीही पाटील यांनी यावेळी बोलताना केली.

काँग्रेसचे गोवा कार्याध्यक्ष व आमदार ॲड. कार्लुस फेरेरा हे यावेळी बोलताना म्हणाले की या घोटाळ्यात ज्यांचा हात आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. या प्रकरणी केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. हा संघटितपणे करण्यात आलेला घोटाळा असल्याचे त्यानी नजरेत आणून दिले. या गंभीर घोटाळ्याच्या मुळाशी जाऊन चौकशी केली जावी व गुन्हेगारांना कडक शिक्षा केली जावी, अशी त्यानी मागणी केली.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर व प्रदेश युवा काँग्रेस अध्यक्ष अर्थिन नाईक हेही हजर होते.