पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली माहिती
रामा काणकोणकर हल्ला प्रकरणातील मास्टर माईंड जेनिटो कार्दोज (सांताक्रूझ) याला पणजीतील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती काल उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. रामा काणकोणकर हल्ला प्रकरणाचा विविध अंगांनी तपास करण्यात आला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोज असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळेच पोलीस निरीक्षक विजयकुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशयित सूत्रधार जेनिटो कार्दोज याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे, असे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले.
रामा काणकोणकर यांच्यावर 18 सप्टेंबर 2025 रोजी दिवसाढवळ्या करंजाळे पणजी येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली असून जेनिटो हा आठवा संशयित आहे.
रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणातील सूत्रधाराला रविवापर्यंत अटक करण्याची मागणी करण्यात आली होती.
रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलिसांनी पणजी परिसरातील गुंडांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली असून आतापर्यंत 23 गुंडांना प्रतिबंधात्मक अटक केली आहे. रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या टोळीतील दोन गुंडांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली आहे. त्या दोघांचा रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात संबंध नाही, असे पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाड्यांचीही ओळख पटली आहे. या गाड्या आज सोमवारी जप्त करण्यात येणार असून यामुळे पोलिसांना आणखी पुरावे गोळा करण्यास मदत होईल अशी माहिती दिली.
कारण अस्पष्ट
रामा काणकोणकर यांच्यावरील हल्या मागील हेतू अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही, परंतु पूर्वीचे शत्रुत्व असल्याचे दिसून येते, असे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले.
रामावर हल्ला करण्यासाठी कंत्राट देण्यात आले असावे. अटक केलेल्या 7 आरोपींच्या सखोल चौकशी आणि उपलब्ध असलेल्या सर्व पुराव्यांवरून असे उघड झाले की जेनिटो आरोपींना हे घृणास्पद कृत्य करण्यास सांगितले होते, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा इशारा
गोवा हे एक सुशिक्षित राज्य आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना सोडले जाणार नाही. कोणतीही तडजोड केली जाणार नाही, कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिला.

