रामा काणकोणकर यांनी आपल्या जबानीत काही जणांची नावे घेतली आहेत, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे; मात्र पोलिसांनी त्याबाबत माहिती देण्यास तूर्त नकार दिला. त्यांनी दिलेल्या जबानीनुसार चौकशी केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.
प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांची जबानी गुरुवारी रात्री पणजी पोलिसांनी नोंदवून घेतली. मिंगेल आरावजो हा आपला पाठलाग करीत असे. तसेच मारहाण करताना हल्लेखोरांनी आपणाला गावडा आणि राखणदार म्हटल्याचे काणकोणकर यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.
गेल्या 18 सप्टेंबरला भरदिवसा करंजाळे पणजी येथे रामा काणकोणकर यांच्यावर सात गुंडांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर अजूनही बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहेत. पणजी पोलिसांनी या प्रकरणात संशयित आरोपी जेनिटो कार्दोज यांच्यासह आठ जणांना अटक केली होती. त्यांची न्यायालयात कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रामा काणकोणकर यांची जबानी प्रकृती ठीक नसल्याने पोलीस नोंदवू शकले नव्हते. पोलिसांनी जबानी नोंदविण्यासाठी अनेकदा प्रयत्न केला होता. अखेर 14 व्या दिवशी त्यांची जबानी नोंदवली. रामा काणकोणकर यांची जबानी नोंद करण्यात आल्याने हल्ला प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरोग्यमंत्र्यांकडून
प्रकृतीची विचारपूस
दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल गोमेकॉमध्ये उपचार घेणाऱ्या रामा काणकोणकर आणि त्यांची पत्नी रती काणकोणकर यांची भेट घेऊन प्रकृतीबाबत विचारपूस केली. त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खास डॉक्टरांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. डिस्चार्ज देण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. उपचारात कोणत्याही प्रकारची कमी राहणार नाही, असे आरोग्यमंत्री राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी गोमेकॉचे डीन डॉ. जयप्रकाश तिवारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील व इतरांची उपस्थिती होती.

