करंजाळे-पणजी येथे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रामा काणकोणकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीबाबत प्रसारमाध्यमांतून वेगवेगळी वृत्ते प्रसिद्ध होत असल्याने उत्तर गोव्याच्या पोलीस अधीक्षकांनी काल जबानीबाबत स्पष्टीकरण दिले. हल्ला प्रकरणातील मिंगेल आणि आणखी दोन व्यक्ती काणकोणकरांना आठवतात आणि ते हल्लेखोरांना ओळखू शकतात. याशिवाय त्याने त्याच्या जबाबात इतर कोणाचेही नाव घेतलेले नाही, असे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
रामा काणकोणकर यांच्यावर करंजाळे पणजी येथे 18 सप्टेंबर रोजी झालेल्या प्राणघातक हल्यात ते गंभीर जखमी झाले होते. पणजी पोलिसांनी गेल्या 2 ऑक्टोबर रोजी गोमेकॉच्या वॉर्ड क्रमांक 121 मध्ये उपचार घेणाऱ्या काणकोणकर यांचा जबाब नोंदवून घेतला आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
या प्रकरणात रामा काणकोणकर यांनी आपल्या जबानीमध्ये करंजाळे येथील कामाक्षी हॉटेलजवळ एका गटाने त्यांच्यावर कसा हल्ला केला याबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. हल्ल्यादरम्यान त्याने मिंगेल नावाच्या एका आरोपीची ओळख पटवली होती. मिंगेलने पूर्वी दोनदा त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने त्याच्या जबाबात त्या दोन्ही घटनांचे वर्णन केले आहे. या हल्ला प्रकरणातील आणखी दोन व्यक्ती त्यांना आठवतात आणि ते हल्लेखोरांना ओळखू शकतात. याशिवाय त्याने त्याच्या जबाबात इतर कोणाचेही नाव घेतलेले नाही. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे, असे राहुल गुप्ता यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

