राममंदिर दान चोरीप्रकरणी 8 जणांवर गुन्हा

0
17

ट्रस्टने दाखल केली एफआयआर

एसआयटीने मानले होते 17 जणांना आरोपी

अयोध्या येथील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाला कायदेशीर वळण लागले असून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने गुरुवारी याप्रकरणी अधिकृतपणे एफआयआर दाखल केली आहे. यात 8 आरोपी बनवण्यात आले आहेत. अयोध्येतील राम मंदिराला देणगी म्हणून मिळालेली रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंची चोरी, त्यांचा गैरवापर व अपहार केल्याचा आरोप या आठजणांवर ठेवण्यात आला असून त्यांच्या विरोधात अयोध्येतील रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांनी एसआयटीच्या प्राथमिक अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल केला.

एसआयटीने तपास अहवालात चंपत राय, विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा आणि बांधकाम प्रभारी गोपाल राव यांच्यासह 17 जणांना आरोपी मानले होते. त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल होणे जवळपास निश्चित मानले जात होते.

या पहिल्या एफआयआरमध्ये आरोपी म्हणून ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचे नाव नाही. मात्र त्यांचे निकटवर्तीय सहकारी टिन्नू यादव यांचे नाव आहे. या एफआयआरमध्ये ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे चालक रामशंकर यादव (टिन्नू), लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला, मनीष यादव, रमाशंकर मिश्रा, सुभाष चंद्र श्रीवास्तव आणि करुणेश पांडे यांची नावे आहेत.

एसआयटी तपासणीसाठी 13 जून रोजी स्थापन करण्यात आली होती. 23 जून रोजी तिने आपला अहवाल सरकारला सादर केला होता.
चौकशीदरम्यान दानपेट्यांच्या चाव्या टिन्नूकडे मिळाल्या होत्या. एसआयटीने सुमारे 150 अशा सेवकरी आणि कर्मचाऱ्यांची ओळख पटवली होती, ज्यांच्या आर्थिक स्थितीत 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर बदल झाला होता.

अयोध्येतील राम मंदिरातील देणग्यांमधील कथित गैरव्यवहार आणि देणगी चोरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने तपास पूर्ण करून उत्तर प्रदेशच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना अहवाल सादर केल्यानंतर अयोध्या येथील पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंपत राय यांचा राजीनामा नाही

चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचा दावा गुरुवारी सकाळपासून सोशल मीडियावर केला जात होता. मात्र, मंदिर निर्माण प्रभारी गोपाळ राव आणि विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस बजरंग लाल बागडा यांनी या बातम्या फेटाळल्या आहेत. चंपत राय यांनी राजीनामा दिलेला नसून सोशल मीडियावर चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, एसआयटीच्या अंतिम अहवालाची वाट पाहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

खासदार संजय सिंह यांनी दिले जमीन घोटाळा पुरावे

अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीला आप खासदार संजय सिंह यांनी जमीन घोटाळ्याशी संबंधित पुरावे दिले. संजय सिंह काल गुरुवारी सकाळी 11 वाजता लखनऊमध्ये एसआयटीचे अध्यक्ष विजय विश्वास पंत यांच्या कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी राम मंदिरात झालेल्या जमीन घोटाळ्याचे 11 कागदपत्रे मी एसआयटीला सोपवली असल्याची माहिती त्यांनी दिली.

विहिंपची बैठक रद्द

विश्व हिंदू परिषदेने आपली केंद्रीय व्यवस्थापन समितीची बैठक रद्द केली आहे; ही बैठक मूळतः 26 ते 29 जून या कालावधीत अयोध्येत होणार होती आणि ती रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 18-19 जून रोजी हरिद्वारमध्ये झालेल्या परिषदेच्या केंद्रीय सल्लागार मंडळाच्या बैठकीत साधू-संतांनी देणग्यांच्या गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्या बैठकीत ‘रामालया न्यास’ आणि ‘राम जन्मभूमी निर्माण समिती’ यांना मिळालेल्या देणग्यांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली होती.