राज्य सरकार बेफिकीर

0
154

>> मुख्यमंत्री, मंत्री जिल्हा पंचायत प्रचारकार्यात गुंग

आरोग्य खात्याने राज्यातील आठवडी बाजार, पब्स, शिकवणी वर्ग, शॉपिंग मॉल्स येत्या ३१ मार्च २०२० पर्यत बंद ठेवण्याचा आदेश काल जारी केला. आज शुक्रवार दि. २० मार्च रोजी मध्यरात्रीपासून हा आदेश लागू होणार आहे, असे आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसौझा यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

कोरोना विषाणूच्या (कोविड-१९) पार्श्‍वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी दरदिवशी नवनवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या जात आहेत. राज्य पातळीवर मार्गदर्शक सूचनांची योग्य अंमलबजावणीकडे योग्य प्रकारे लक्ष दिला जात नसल्याने काही जणांकडून मार्गदर्शक सूचनांचा गैरफायदा घेतला जात आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मीडिया व इतर माध्यमातून अफवांना मोठ्या प्रमाणात पसरविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री, मंत्री जिल्हा पंचायत प्रचारकार्यात गुंतल्याने गैरप्रकारांकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. सत्ताधारी भाजपकडून जाहीर प्रचार सभा घेऊन कोरोना मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केले जात आहे.

नागरिकांना मास्क, सॅनिटायझर वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये मास्क, सॅनिटायझर या महत्त्वाच्या वस्तू दाम दुप्पट दराने विक्री केली जात आहे. मार्केटमध्ये अन्य धान्याच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे काही व्यावसायिक साठेबाजी निर्माण करून बाजारात आवश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेट्रोल पंपावरसुद्धा वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी लोकांच्या रांगा दिसून येत आहे. वाहन चालकांकडून वाहनात मोठ्या प्रमाणात इंधन भरून ठेवले जात आहे.

राज्यातील बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार असल्याची अफवा पसरविण्यात आल्याने नागरिकांची बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. मार्केटमध्ये साठेबाजी करून वस्तूचा दर वाढविला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कोरोना विषाणूबाबत भाजप सरकार गंभीर नाही. कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याने त्यांचे पालन करणे सत्ताधारी पक्षाचे प्रथम कर्तव्य आहे. परंतु, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह मंत्री, सत्ताधारी आमदारांकडून मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून जाहीर प्रचार सभांचे आयोजन केले जात आहे, अशी टीका आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल करण्यात आली असून शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. केनेथ सिल्वेरा यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्यातील काही राजकीय पक्षांकडून जिल्हा पंचायत निवडणूक कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, पश्‍चिम बंगाल येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.

रविवारपासून आंतरराष्ट्रीय
विमानांना लँडिंग नाही

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवेसंदर्भात केंद्र सरकारने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या रविवार दि. २२ मार्चपासून एकाही आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानाला भारतात लँडिंगची परवानगी दिली जाणार नाही.
केंद्र सरकार ज्या भारतीयांना कोरोनाची लागण झालेली नाही त्यांना पुन्हा मायदेशी आणण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहे. याच पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेल्या १९५ भारतीयांची सुटका करत विशेष विमानाने त्यांना भारतात परत आणण्यात आले. त्यांनी जैसलमेर येथे नेण्यात आले होते. याशिवाय मलेशियामध्ये अडकलेल्या ४०५ भारतीयांनाही पुन्हा मायदेशी परत आणण्यात आले आहे. बुधवारपर्यंत इराणमध्ये ८५० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. केंद्र सरकारने इराणमधून बुधवारी ५८४ भारतीयांची सुटका करत त्यांना मायदेशी आणले. यावेळी २६० भारतीयांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यांनी तिथेच थांबवण्यात आलं आहे.