राज्य सरकारने गेल्या २२ नोव्हेंबरला सरकारी रोख्यांची विक्री करून ५० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर, आता आणखीन १०० कोटी रुपयांच्या कर्जाची सूचना जारी करण्यात आली आहे.
राज्य सरकारचे प्रधान सचिव (वित्त) यांनी यांनी १०० कोटी रुपयांच्या कर्जाची सूचना २४ नोव्हेंबरला जारी केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट मुंबई येथील शाखेकडून सरकारी रोख्यांचा लिलाव येत्या २९ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. या कर्जाची परतफेड ३० नोव्हेंबर २०३२ मध्ये करण्यात येणार आहे, असे सूचनेत म्हटले आहे. या कर्जाचा वापर विकासाच्या संदर्भात भांडवली खर्चासाठी वित्त पुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे. या कर्जासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक मान्यता घेण्यात आली आहे, असेही म्हटले आहे.