राज्य सरकारकडून सर्वोच्चन्यायालयात याचिका दाखल

0
12

15 दिवसांत निकाल अपेक्षित; मंत्री रमेश तवडकरांना विश्वास; आणखी 2 याचिका येणार

राज्यातील अनुसूचित जमातींच्या (एसटी) राजकीय आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या अंतरिम आदेशाला आव्हान देणारी याचिका काल गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली, अशी माहिती आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी देखील त्याला दुजोरा दिला. या आरक्षणप्रश्नी केंद्र सरकार आणि एसटी समाज देखील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे; पण त्याआधीच राज्य सरकारने आव्हान याचिका दाखल केली आहे.

गोव्यातील एसटी राजकीय आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाकडून 8 ते 15 दिवसांत निकाल अपेक्षित आहे. आपणाला एसटी राजकीय आरक्षण प्रश्न लवकरच सुटेल असा विश्वास आहे. उच्च न्यायालयात एसटी आरक्षण प्रश्नी पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे, त्याआधीच सर्वोच्च न्यायालयाचा आदेश येऊ शकतो, असा दावा मंत्री रमेश तवडकर यांनी केला.
गोवा खंडपीठाच्या एसटी राजकीय आरक्षण प्रश्नी दिलेल्या अंतरिम आदेशाला आव्हान देणाऱ्या एकूण तीन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या जाणार आहेत. त्यातील गोवा सरकारने आपली याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकारकडूनही आव्हान याचिका दाखल केली जाणार आहे. तसेच, एसटी समाजातील संस्थेकडून आव्हान याचिका सादर केली जाणार आहे, असेही तवडकर यांनी सांगितले.
आगामी 2027 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकार या विषयाच्या निराकरणासाठी कायदेशीर प्रक्रिया पुढे नेत आहे, असेही मंत्री तवडकर यांनी सांगितले.

कायदेशीर बाबींची
तपासणी सुरू : दामू नाईक

राज्य सरकार संबंधित मंत्रालय आणि वकिलांशी सल्लामसलत करून उच्च न्यायालयाच्या आदेशातील कायदेशीर व तांत्रिक बाबींची तपासणी करत आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. राज्यातील अनुसूचित जमातींसाठी राजकीय आरक्षण मिळवून देण्याबाबत पक्ष संघटना कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

नेमके प्रकरण काय?
अनुसूचित जमातींच्या (एसटी) राज्यातील अंदाजित लोकसंख्येबाबत जनगणना आयुक्तांकडून जारी होणाऱ्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने 29 ऑक्टोबरला अंतरिम स्थगिती दिली होती. राज्यातील एसटींना राजकीय आरक्षण द्यायचे असेल, तर समाजाची अंदाजित लोकसंख्या जाहीर करणे जनगणना आयुक्तांना बंधनकारक आहे. मात्र त्यासंबंधीच्या अधिसूचनेलाच अंतरिम स्थगिती दिल्यामुळे एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे.

दिल्लीत काय चर्चा झाली?
एसटी राजकीय प्रश्नांशी संबंधित कायदेशीर आणि तांत्रिक अडचणींवर चर्चा करण्यासाठी आपल्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने नवी दिल्लीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची सोमवारी भेट घेतली होती. एसटी राजकीय आरक्षण प्रश्नी सुमारे पाऊण तास चर्चा करून एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणातील त्रुटींवर चर्चा करण्यात आली, असेही मंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले.