राज्य सरकारकडून पुन्हा मराठीला डावलण्याचा प्रयत्न

0
13

राज्य युवा महोत्सवातील स्पर्धांत मराठीसोबत दुजाभाव; टीकेनंतर क्रीडा-युवा व्यवहार खात्याकडून सारवासारव

राज्य सरकारच्या क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याने 22 व्या राज्य युवा महोत्सवानिमित्त आयोजित कथा, कविता, वत्कृत्व स्पर्धांमध्ये मराठी भाषेला वगळल्याचा प्रकार काल समोर आल्याने मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. या प्रकाराबाबत क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांना काहींनी जाब विचारल्यानंतर त्यांनी सारवासारव करून नंतर मराठी भाषेचा समावेश असल्याचे सांगत प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला.

क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याने 22 व्या राज्य युवा महोत्सव 2025 च्या अटी आणि नियमांची माहिती देणारे माहितीपत्रक सर्व महाविद्यालयांना काल पाठविले. या माहितीपत्रकाचे वाचन केल्यानंतर स्पर्धांतून मराठी भाषेला वगळण्यात आल्याचे निदर्शनास आले. राज्य पातळीवरील कथा, कविता, वत्कृत्व आदी स्पर्धांसाठीच्या प्रवेशिका हिंदी, कोकणी आणि इंग्रजी भाषेतून स्वीकारण्यात येतील, तर राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांच्या प्रवेशिका हिंदी आणि इंग्रजी भाषेतून स्वीकारण्यात येतील, असे नमूद करण्यात आले होते. या प्रकारामुळे मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली. राज्य सरकारने सरकारी नोकऱ्यांसाठी कोकणीची सक्ती करत मराठीला डावलले आहे. त्यातच आता राज्य युवा महोत्सवातूनही मराठी भाषेला वगळल्याची चर्चा सुरू झाली. हा प्रकार क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी सारवासारव केली.

तांत्रिक कारणामुळे घोळ झाल्याचा दावा
राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी दरवर्षी इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांतून स्पर्धांचे आयोजन केले जात होते. यावर्षीपासून युवा महोत्सवासाठी राज्य पातळीवर स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात हिंदी, इंग्रजी, कोकणी व मराठी या भाषांचा समावेश केला आहे. महाविद्यालयांना माहितीपत्रक पाठविताना काही तांत्रिक कारणामुळे घोळ झाला. महाविद्यालयांना सुधारित माहितीपत्रक बुधवारी पाठविले जाणार आहे, असे अजय गावडे म्हणाले.

मराठीचा समावेश करणार : संचालक
दरम्यान, युवा महोत्सवामध्ये राज्य पातळीवरील कथा, कविता, वत्कृत्व आदी स्पर्धांमध्ये कोकणीबरोबरच मराठी भाषेचा समावेश करण्यात आला असून, सुधारित परिपत्रक महाविद्यालयांना बुधवारी पाठविले जाणार आहे, असे स्पष्टीकरण क्रीडा आणि युवा व्यवहार संचालक डॉ. अजय गावडे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना काल दिले.