24 तासांत पडझडीच्या 184 घटना
24 ते 25 लाख रुपयांचे नुकसान
देशभरात पावसाचे थैमान
राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी असले तरी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड सुरू आहे. चोवीस तासांत पडझडीच्या सुमारे 184 घटनांची नोंद झाली असून सुमारे 24 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाले असून हवामान खात्याने 10 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
चोवीस तासांत फोंडा येथे पडझडीच्या सर्वाधिक 28 घटनांची नोंद झाली आहे. वाळपई आणि पेडणे येथे प्रत्येकी 20 घटना, कुडचडे येथे 19 घटना, डिचोली व म्हापसा येथे प्रत्येकी 18 घटनांची नोंद झाली आहे.
राज्यात मागील तीन दिवसांपासून प्रतितास 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे. सोसाट्याच्या वाऱ्याचा वेग ताशी 70 किलोमीटरपर्यत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांची घरे, वाहने, विजेचे खाब आदींवर झाडे मोडून कोसळत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मागील तीन दिवसांत तीनशेपेक्षा जास्त झाडांच्या पडझडीच्या घटनांची नोंद झालेली आहे. अग्निशामक दलाचे जवान मोडून पडलेली झाडे हटविण्याच्या कामात गुंतलेले आहेत.
राज्यात चोवीस तासांत 1.18 इंच पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत 34.39 इंच पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने येत्या 10 जुलैपर्यंत राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करून एलो अलर्ट जारी केला आहे.
सांगे येथे सर्वाधिक 3.79 इंच पावसाची नोंद झाली आहे. वाळपई येथे 1.96 इंच, धारबांदोडा येथे 1.66 इंच, साखळी येथे 1.48 इंच, केपे आणि फोंडा येथे प्रत्येकी 1.37 इंच पावसाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रातील लोणावळ्यात भूस्खलन
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले असून काही ठिकाणी पुराच्या घटनाही घडल्या आहेत. लोणावळा येथील नॉर्थ पॉइंट आणि थ्री सिक्सटी रिसॉर्ट परिसरात आज अचानक भीषण भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत दोन व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर दरड
मुंबई-गोवा महामार्गवरील लोटे येथे वाहतूक पोलीस चौकीसमोर डोंगरावरील दरडीचा भाग कोसळला. मुसळधार पावसामुळे डोंगरातील मोठे दगड, माती आणि झाडे कोसळल्याने भूसखलनाचा धोका वाढला. गोव्याकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी बंद करून दुसऱ्या लेनने सुरू केली आहे. मात्र, दरडी कोसळत असल्याने मातीचा मोठा ढीग रस्त्यावर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
महाबळेश्वरमध्ये 24 तासांत
विक्रमी 20 इंच पाऊस
सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कहर केला असून महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 513 मिलिमीटर म्हणजेच 20 इंच इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील 60 गावांचा संपर्क तुटला असून हजारो लोक अडकले आहेत. पुणे-पानशेत रस्त्यावरील वरदाडे येथील तात्पुरता रस्ता आणि पूल मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेला आहे.
मुंबईत 48 तासांत 15 इंच पाऊस
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही काल मुसळधार पाऊस पडला. मुंबईत गेल्या 48 तासांत सुमारे 15 इंच पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतील सर्व शाळा व महाविद्यालयांना काल मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
अरुणाचलमध्ये पूर
अरुणाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक पूर आणि भूस्खलन झाले आहे. चालू पावसाळ्यात राज्यातील 26 जिल्ह्यांमधील 94,000 हून अधिक लोकांना आतापर्यंत फटका बसला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्याच्या वरच्या भागात ढगफुटी झाल्यामुळे दरडी कोसळून ढिगारा निवासी वस्त्यांमध्ये घुसला. यामुळे रस्त्यांवरील अनेक वाहने गाडली गेली.
बेतुल येथे जेटीचा भाग कोसळला
बेतूल येथे ओएनजीसीने अरबी समुद्राजवळ बांधलेल्या जेटीचा एक भाग काल मंगळवारी समुद्रातील वादळी लाटांमुळे कोसळला. त्यामुळे सुमारे 100 कोटी रुपयांचे नुकसान झाले. ही तरंगती जेटी गेल्या जानेवारी महिन्यात 100 कोटी रुपये खर्च करून बांधली होती. जानेवारी 2026 उर्जा सप्ताहात भरलेल्या जागतिक परिषदेदरम्यान समुद्रात ही तरंगती जेटी बांधली होती. अतिमहनिय प्रतिनिधींना समुद्रमार्गे परिषदेच्या त्या जेटीवर जहाजातून उतरून लिफ्टने वरती जाण्यासाठी ही जेटी बांधली होती. काल ती कोसळून पाण्यात वाहून गेली.
वायनाड-केरळमध्ये भूस्खलन; तिघांचा मृत्यू, 8 जण जखमी
केरळमधील वायनाडमध्ये मंगळवारी सकाळी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. या दुर्घटनेत 3 लोकांचा मृत्यू झाला असून, 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेत अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले असून ही दुर्घटना कल्लाडी येथील मीनाक्षी पुलाजवळ घडली. येथे मलप्पुरम-वायनाड बोगदा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. बोगद्यातून बाहेर जमा करण्यात आलेली माती पावसामुळे सरकली व त्यामुळे झाडे उन्मळून पडली आणि बॅरिकेड्सही वाहून गेले. दोन वर्षांपूर्वीही वायनाडमध्ये एकापाठोपाठ तीन भूस्खलन झाले होते, ज्यात 400 हून अधिक लोकांचा बळी गेला होता.

