राज्यात 1 जुलैपासून 26 ठिकाणी एआय कॅमेरे

0
9

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो; राज्य रस्ता सुरक्षा मंडळाची बैठक संपन्न; अपघातांत 17 टक्के घट

राज्यात येत्या 1 जुलै 2026 पासून 26 ठिकाणी एआय आधारित कॅमेरे कार्यान्वित केले जाणार आहेत. अपघातांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक नियमांच्या कडक अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी राज्य रस्ता सुरक्षा मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्यातील अपघातप्रवण क्षेत्रांच्या सुधारणांचे काम हाती घेण्यात आल्याने मागील दोन वर्षांत वाहन अपघातांच्या प्रमाणात सुमारे 17 टक्के घट नोंद झाली आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

यापूर्वी राज्यभरात येत्या 16 जूनपासून एआय आधारित कॅमेरे कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला होता. वाहनचालकांमध्ये एआय आधारित कॅमेऱ्यांबाबत जनजागृती करण्यासाठी ते कार्यान्वित करण्याचा निर्णय 15 दिवसांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळात वाहतूक खात्याचे अधिकारी एआय कॅमेऱ्यांबाबत वाहनचालकामध्ये जनजागृती मोहीम राबविणार आहेत. त्यानंतर 1 जुलैपासून 26 ठिकाणी एआय आधारित कॅमेरे कार्यान्वित केले जाणार आहेत, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.
राज्यात ‘रेंट अ कार’मुळे वाहन अपघातांत वाढ झाली आहे. त्यामुळे रेंट अ कारच्या तपासणीकडे लक्ष केंद्रित करण्याची सूचना वाहतूक अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. रेंट अ कारसाठी स्पीड नियंत्रक, मोटर वाहन नियमांची सक्ती आणि परवान्यांची तपासणी केली जाणार आहे, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.

वाहतूक खात्याकडून वाहनांच्या टिंटेड ग्लासच्या विरोधात मोहीम राबविली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गालगतची बेकायदा बांधकामे हटविली जाणार आहेत. बेकायदा बांधकामे हटविण्यासाठी नगरपालिका आणि ग्रामपंचायतींशी संपर्क साधला जाणार आहे, असेही वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.