राज्यात ८६.१४ इंच पावसाची नोंद

0
11

>> केपे, सत्तरी तालुक्यात पाऊस १०० इंचांच्या पार

राज्यात मागील पंचवीस दिवसात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पावसाची ५.१ टक्के तूट निर्माण झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ८६.१४ इंच पावसाची नोंद झाली. सत्तरी आणि केपे येथे पावसाने इंचाचे शतक पूर्ण केले असून, पेडणे येथे पाऊस इंचाच्या शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

राज्यात मोसमी पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यामुळे जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी नोंद झाले होते. जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या सतरा दिवसात चांगल्या प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे मोसमी पावसाची तूट भरून आली होती. तसेच पावसाचे प्रमाण ४० टक्के अधिक नोंद झाले होते. तथापि, जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाचे प्रमाण कमी झाले.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे प्रमाण वाढलेले नाही. ऑगस्ट महिन्यात केवळ दोन दिवस अंदाजापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. या महिन्यातील नऊ दिवसात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पावसाची आत्तापर्यंत ५.१ टक्के तूट निर्माण झाली आहे.

वाळपई आणि केपे येथे पावसाने इंचाचे शतक पूर्ण केले आहे. वाळपई येथे १०५.०३ इंच आणि केपे येथे १०१.५४ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे मोसमी पाऊस इंचाच्या शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पेडणे येथे ९९.२३ इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे येथे ९७.३६ इंच आणि काणकोण येथे ९४.८६ इंच पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात चोवीस तासात वाळपई येथे सर्वाधिक १.६५ इंच पावसाची नोंद झाली आहे. काणकोण, सांगे, केपे, साखळी, पेडणे येथेही काही प्रमाणात पावसाची नोंद झाली. राज्यातील इतर भागातील पावसाचे प्रमाण कमी आहे.