मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे निर्देश; मंजूर वीजभार आणि वाढीव बिलांच्या पडताळणीची वीज खात्याला सूचना
राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम स्थगित ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वीज खात्याला काल दिला. तसेच ग्राहकांच्या मंजूर वीज-भाराची (लोड) व वाढीव वीज बिलांची पडताळणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. हणजूणच्या ग्रामस्थांनी गुरुवारी वीज खात्याच्या मुख्यालयात आंदोलन छेडत या प्रश्नी अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. तसेच शुक्रवारी मडगाव शहरातील नागरिकांनी मंत्री दिगंबर कामतांसह वीज अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना जाब विचारला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट मीटर बसवण्यास स्थगिती, तर वाढीव वीज बिले आणि मंजूर वीजभाराच्या पडताळणीचे निर्देश दिले.
राज्यात वाढीव वीज बिले आणि स्मार्ट मीटरचा प्रश्न गेल्या आठ-दहा दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. वीज ग्राहकांकडून वाढीव वीज बिलामुळे संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक आमदार आणि मंत्र्यांकडे ग्राहक वाढीव वीज बिलांचा प्रश्न मांडून त्यात लक्ष घालून दिलासा देण्याची मागणी करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर, काही मंत्री, आमदारांनी संपर्क साधून वाढीव वीज बिले आणि स्मार्ट मीटरच्या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिलाच्या घोळाची काल गंभीर दखल घेतली.
तसेच काँग्रेस, आम आदमी पक्षाने स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिलांच्या प्रश्नामध्ये आवाज उठविला होता. हणजूण ग्रामस्थांनीही वीज खात्याच्या मुख्यालयात वाढीव बिलांच्याविरोधात आंदोलन करून वीज ग्राहकांना न्याय देण्याची मागणी केली होती.
उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काय निर्देश दिले?
वीज खात्याचे मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस व अधिकाऱ्यांसोबत काल घेतलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिलांच्या घोळाचा आढावा घेतला.
त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी मुख्य वीज अभियंत्यांना राज्यातील स्मार्ट मीटर बसविण्याचे काम वाढीव वीज बिलांचा प्रश्न सुटेपर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश दिला.
तसेच, ग्राहकांना देण्यात आलेल्या बिलांची आणि ग्राहकांचा वीज भार पडताळणी करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
..तोपर्यंत वीज जोडणी तोडणार नाही
वाढीव बिलांची पडताळणी करून ग्राहकांना सुधारित बिले दिले जाणार असून, वीज बिलांचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत कुठल्याही ग्राहकाचे वीज जोडणी तोडली जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
दंडालाही स्थगिती
ग्राहकांकडून विजेचा अधिक भार (लोड) वापरल्याबद्दल आकारला जाणारा दंडही स्थगित केला जाणार आहे. ज्या ग्राहकांना दंड आकारण्यात आला आहे, त्यांनी विभागाकडून आपल्या वीजभाराची पडताळणी करून घ्यावी. तसेच, ज्यांनी आधीच दंड भरला आहे, त्यांनी पडताळणीसाठी वीज विभागाकडे पत्र सादर करावे. ग्राहकांनी नव्याने वीज भार निश्चित करून घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

