राज्यात सहकारी तत्त्वावर टॅक्सी सेवेचा विचार : सहकार निबंधक

0
14

केंद्र सरकारने घोषित केलेल्या सहकारी टॅक्सीच्या धर्तीवर गोव्यात सहकारी तत्त्वावरील टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचारविनिमय सुरू आहे, अशी माहिती राज्याचे सहकार निबंधक आशुतोष आपटे यांनी पीएचडी सीसीआयने गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सभागृहात आयोजित गोवा सहकार परिषदेत बोलताना काल दिली.

गोवा राज्यात पर्यटन क्षेत्रात सहकार वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. पर्यटन क्षेत्रात सहकारी तत्त्वावर टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू करण्यात आली आहे. याबाबत सखोल अभ्यास केल्यानंतर पुढील पाऊल उचलण्यात येणार आहे, असेही आपटे यांनी सांगितले.
राज्यात सुमारे साडे पाच हजार सहकारी संस्थांची नोंदणी आहे. बहुतेक संस्था एकाच प्रकारचा व्यवसाय करतात. या संस्थांना एकाहून अधिक व्यवसाय करण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आयटी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. येत्या डिसेंबर 2025 अखेरपर्यंत प्रत्येक पंचायत क्षेत्रात किमान एक सहकारी संस्था स्थापन करण्याचे लक्ष्य आहे, असे आपटे यांनी सांगितले.
राज्यातील मिठागरांच्या पुनरुज्जीवनासाठीही प्रयत्न केला जात आहे. सहकारी तत्त्वावर मिठागरे चालवण्याबाबत विचारविनिमय केला जात आहे, असेही आपटे म्हणाले.

या परिषदेत राज्यातील सहकार क्षेत्राला गतिमान करण्यासाठी विविध विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी नाबार्डचे कार्यकारी व्यवस्थापक संदीप धारकर, जीसीसीआयच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड, आरबीआयचे प्रादेशिक संचालक प्रभाकर झा व इतरांची उपस्थिती होती.