सातव्या मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाचे उद्घाटन
विज्ञान हा विषय केवळ पाठ्यपुस्तक, प्रयोगशाळा यांच्या पुरता मर्यादित राहता कामा नये. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संशोधनाला चालना मिळाली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सातव्या मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना एनआयओ -दोनापावल येथे काल केले.
राज्यात विज्ञान महोत्सवामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यास मदत होणार आहे. राज्यातील 18 ठिकाणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून 19 शास्त्रज्ञ दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील नवीन संकल्पना, संशोधन, शास्त्रज्ञांना त्यांच्या प्रयोगात आलेल्या समस्या, त्यावर काढलेले उपाय आदी विषयांची माहिती मिळेल. विद्यार्थ्यांना या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नवीन संधीबाबत माहिती मिळणार आहे.
गोव्यात राष्ट्रीय पातळीवरील विविध शिक्षण आणि संशोधन संस्था कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांनी सर्व संस्थांमधून मिळणाऱ्या ज्ञानाचा लाभ घेतला पाहिजे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
विज्ञान महोत्सव गोव्याच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. युवा वर्गाने देशातील समस्या जाणून त्याचे उत्तर विज्ञानातून शोधून काढावे, असे आवाहन डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
युवा वैज्ञानिक पुरस्कार प्रदान
या कार्यक्रमात मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार बंगळूर येथील साई गौतम गोपाळकृष्णन याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. किरण कुमार, जुझे मानुएल नोरोन्हा, डॉ. सुनील सिंग, परिमल अभिषेक यांची उपस्थिती होती.

