राज्यात पाऊस 90 इंचांच्या पार

0
18

राज्यात मोसमी पावसाने इंचाची नव्वदी पार केली असून, आत्तापर्यंत 91.49 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्याला मागील चोवीस तासांत जोरदार पावसाने झोडपून काढले असून, चोवीस तासांत 4.14 इंच पावसाची नोंद झाली. वायव्य बंगाल उपसागर आणि उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओरिसा किनारी भागातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात सुरूवातीला पावसाचे प्रमाण कमी होते. यानंतर 13 ऑगस्टपासून पावसाला पुन्हा जोर चढला आहे. मागील चोवीस तासांत जोरदार पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. राज्याच्या सर्वच भागात जोरदार पावसाची नोंद झाली. येथील हवामान विभागाने राज्यात येत्या 22 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली असून, यलो अलर्ट जारी केला आहे. चोवीस तासांत साखळी येथे सर्वाधिक 5.21 इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा येथे 4.09 इंच, पेडणे येथे 3.88 इंच, पणजी येथे 3.08 इंच, जुने गोवे येथे 4.52 इंच, धारबांदोडा येथे 5.18 इंच, काणकोण येथे 3.83 इंच, दाबोळी येथे 3.29 इंच, मडगाव येथे 5.16 इंच, मुरगाव येथे 3.48 इंच, केपे येथे 3.74 इंच पावसाची नोंद झाली. वाळपई, फोंडा, सांगे येथील पावसाची माहिती उपलब्ध झाली नाही.