राज्यात पणजी शहरात सर्वाधिक वायू प्रदूषण

0
20

>> केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची राज्यसभेत माहिती

वायू प्रदूषणाच्याबाबतीत राजधानी पणजी शहराचा गोव्यात सर्वात वरचा क्रमांक लागत असल्याचे राज्यसभेतील एका प्रश्नाच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. तसेच वायू प्रदूषणाच्या बाबतीत देशातील 389 शहरांमध्ये पणजी शहराचा क्रमांक हा 230 वा असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत दिलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. देशातील वायू प्रदूषणासंबंधीची स्थिती काय आहे, असा प्रश्न राज्यसभेत विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना चौबे यांनी देशभरातील 389 शहरातील वायू प्रदूषणासंबंधीची माहिती दिली असून, त्यानुसार वायू प्रदूषणाच्याबाबतीत गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहराचा क्रमांक हा देशात 230 वा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पणजी शहरातील वायू प्रदूषण हे क्युबिक मीटरमागे 73 मायक्रोग्राम एवढे असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली आहे. क्युबिक मीटरमागे 60 मायक्रोग्राम एवढा स्तर म्हणजे शुद्ध हवा असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. गोव्यातील अन्य काही शहरातील वायू स्तर पुढीलप्रमाणे आहे. कुंकळ्ळी येथे क्युबिक मीटरमागे 67, उसगाव-पाळी 64, फोंडा 63, कोडली 62, डिचोली 61, होंडा 61, सांगे 60, आमोणा 59, मडगाव 59, तुये 59, वास्को 58, अस्नोडा 58, म्हापसा 57, कुंडई 62, तिळामळ 62 असा वायू प्रदूषणाचा स्तर आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी फेब्रुवारी 2023 पर्यत राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाखाली केंद्राने 8727 कोटी रुपये खर्च केले आहेत.