राज्यात नवीन २ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने संख्या ४५ वर

0
152

राज्यातील कोरोना विषाणूबाधित ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ४५ झाली आहे. कोरोना विषाणूची बाधा झालेले नवीन २ रुग्ण काल आढळून आले. जीएमसीच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित ६ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. कोरोना आयझोलेेशन वॉर्डात कोरोना संशयित ११ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रपरिषदेत काल दिली.
नवी दिल्लीतून रेल्वेने आलेले एक जोडप्याला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. हे जोडपे मुंबईमध्ये रेल्वेत बसले होते. त्यांच्याकडे गोव्यातील रहिवासी असल्याचा दस्तऐवज आहे, असे आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.

इटलीमधून विमानाने गोव्यात आलेल्या एकाही खलाशाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे आढळून आलेले नाही. ट्रुनेट स्क्रिनिंगमध्ये एका खलाशाला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले होते. जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत सदर खलाशाच्या लाळेच्या नमुन्यांची दोन वेळा तपासणी करण्यात आली आहे. दोन्ही वेळेचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, असेही मोहनन यांनी सांगितले.

२४ तासांत ७७५ नमुुन्यांची तपासणी
जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत मागील २४ तास कोरोनाच्या ७७५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून ७३४ नमुने निगेटिव्ह आहेत आणि २ नमुन्यांचा अहवाल पॉझिटीव आला आहे. तर, आणखी ३९ लाळेच्या नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे, अशी माहिती मोहनन यांनी दिली.
आंतरराज्य प्रवास केलेल्या २६९ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. तर, ३७९ जणांना सरकारी क्वारंटाईऩ सुविधेखाली आणण्यात आले आहेत. सरकारी क्वारंटाईनखाली ९८८ जणांना ठेवण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

खासगी लॅबला मनाई
राज्यातील कोविडचे नमुने तपासणी करणाची मान्यता देण्यात आलेल्या पर्वरी येथील एसआरएल या खासगी लॅबला कोविड नमुन्याची तपासणी स्थगित ठेवण्याची आदेश देण्यात आल्याचे मोहनन यांनी सांगितले. यावेळी माहिती खात्याचे सचिव संजय कुमार, माहिती खात्याच्या संचालिका मेघना शेटगावकर यांची उपस्थिती होती.