राज्यात चार मच्छिमारी गावांच्या विकासाचा प्रस्ताव विचाराधीन

0
17

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती; दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येकी 2 गावांचा विकास; तीन दिवसीय मत्स्य महोत्सवाचे उद्घाटन

केंद्र सरकारच्या एका योजनेअर्तंगत राज्यात चार मच्छिमारी गाव (फिशिंग व्हिलेज) विकसित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, उत्तर आणि दक्षिण गोव्यात प्रत्येकी 2 मच्छिमारी गाव विकसित केले जाणार आहेत. तसेच त्या गावात मासेमारीला चालना देण्यासाठी जेटी व इतर साधनसुविधा निर्माण करण्याची योजना आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल कांपाल-पणजी येथे मत्स्योद्योग खात्याने आयोजित तीन दिवसीय मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याावेळी केले.

याप्रसंगी मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हर्ळणकर, खात्याचे सचिव अरुणकुमार मिश्रा, प्रदीप शेट आदींची उपस्थिती होती.
राज्यात पारंपरिक मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्डाचा लाभ मिळवून दिला जात आहे. या कार्डाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. मत्स्य उत्पादन वाढीसाठी अत्याधुनिक पद्धतींचा वापर केला जात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मत्स्योद्योग खात्याकडून राज्यातील मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी मत्स्य महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करून मासेमारीसाठी उपलब्ध योजनांची माहिती दिली जात आहे. तसेच आधुनिक मत्स्य उत्पादन तंत्राची माहिती दिली जाते. मत्स्य व्यवसायासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. मत्स्योद्योग खात्याने योजनांची माहिती देण्यासाठी 34 सागरमित्रांची नियुक्ती केली आहे. व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून युवा वर्गाने मासेमारी व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे, असे मंत्री नीळकंठ हर्ळणकर यांनी सांगितले.

हा मत्स्य महोत्सव 12 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या ठिकाणी 44 व्यावसायिक स्टॉल्स आहेत. महोत्सवानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहण्याची संधी मत्स्यप्रेमींना उपलब्ध झाली आहे.

34 ‘सागरमित्रां’ची नियुक्ती

केंद्र सरकारच्या मत्स्य संपदा योजनेखाली मासेमारी व्यवसाय करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. कृत्रिम पद्धतीने मत्स्य उत्पादनासाठी योजना राबविल्या जात आहेत. राज्यातील मच्छिमारांनी सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. मत्स्योद्योग खात्याच्या योजनांची माहिती देण्यासाठी 34 ‘सागरमित्रां’ची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर स्वयंपूर्ण मित्र सुध्दा योजनांची माहिती देत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.