पक्षाचे ज्येष्ठ नेते सरकार विरोधात कोणतेही वक्तव्य का करीत नाही, असा प्रश्न विचारला असता भाजप सरकारला ‘हनिमून’ काळ म्हणून दोन ते अडीच वर्षे देणे गरजेचे आहे, असे ते उत्तरले.
बेकायदेशीर खाणींना कॉंग्रेसचा पाठिंबा नसेल, असे सांगून खाण व्यवसाय करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेणेही तेवढेच आवश्यक असल्याचे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. २०१४ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर युती करावी, याचा निर्णय घेण्यासाठी कॉंग्रेस महासमितीने समिती स्थापन केली आहे. ही समिती त्यावर निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.
मोपा विमानतळाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यापूर्वी पक्षात एकमत घडवून आणण्याचा प्रयत्न असेल. भविष्यकाळात गोव्यातील विमान वाहतुकीत वाढ होईल, याचाही विचार करावा, लागेल. सध्या पक्षाचे आमदार, नेते या विषयावर कोणतेही मत व्यक्त करण्यास मोकळे आहेत. परंतु पक्षाने निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय असेल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यपद्धतीविषयी आपल्याला कल्पना नाही परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विषयी आपण जे काही ऐकतो त्यावरून त्यांच्यात फॅसिझमचा काही अंश असावा असे वाटते, असे दिग्विजयसिंह यांनी सांगितले. भाजपचे निवडणूक प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी हा आमच्यासाठी विषय नाही, असे सांगून गुजरात हे कर्जावर अवलंबून असलेले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये दारिद्य्र रेषेखालील लोकांची संख्या वाढत असल्याचे ते म्हणाले.
सरकार पाडण्यात स्वारस्य नाही
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सरकार पाडण्यासंबंधी सध्या चर्चा सुरू आहे, त्यावर त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता, त्यावर आपला मुळीच विश्वास नाही. आपला पक्ष निवडणुकीत जनतेने दिलेल्या कौलाचा आदर करीत असल्याचे सांगून विधानसभेत कॉंग्रेस आमदार विरोधी पक्ष म्हणूनच काम करतील व जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न करतील, असे त्यांनी सांगितले.
उत्पन्नातील एक टक्का पक्षाला द्या : दिग्विजय
तळागाळातील कार्यकर्त्यांसह प्रत्येक कॉंग्रेसमनने आपल्या उत्पन्नातील एक टक्का रक्कम पक्षासाठी दान करण्याचे आवाहन गोवा कॉंग्रेस प्रभारी दिग्विजयसिंह यांनी काल कॉंग्रेस विधिमंडळ, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना केले.
पक्ष बळकट करण्यासाठी निधीची गरज असते. पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्ष मजबूत करण्याचे काम केल्यास कॉंग्रेसला, निधीसाठी कुणाकडेही जाण्याची गरज भासणार नाही, असे त्यांनी सांगितले.
अ. भा. कॉंग्रेस गोव्यातील कॉंग्रेसकडे गंभीरपणे पाहात नाही. हा गैरसमज दूर करा. आपण दर महिन्याला एकदा गोव्याला भेट देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रदेश युवक कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस, एनएसयूआय हे पक्षाचे महत्त्वाचे घटक आहेत. सत्तेवर असलेले सरकार वेगवेगळे प्रश्न निर्माण करतो. त्यावर आवाज उठवून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. पक्षात शिस्त अत्यंत महत्त्वाची असून आपण शिस्तीच्या बाबतीत गंभीर असल्याचे ते म्हणाले. शिस्तभंग समित्याही स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. नैसर्गिक स्रोतांचा वापर राज्याच्या विकासासाठी केला पाहिजे. परंतु ते करीत असताना पर्यावरणाची हानी होता कामा नये. त्यामुळे बेकायदेशीर खाणीस कॉंग्रेसचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक कॉंग्रेस कार्यकर्त्याचे राहणीमान साधे असणे आवश्यक आहे. जनसंपर्क वाढविण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दक्षिण गोव्यात कॉंग्रेस खासदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत उत्तर गोव्यातही कॉंग्रेसचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
वरील बैठकीनंतर सिंह यांनी कॉंग्रेस भवनमध्ये कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा केली. आज सकाळी ते खास विमानाने दिल्लीत प्रयाण करतील. सिंह यांच्या गोवा भेटीमुळे कॉंग्रेस वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे कॉंग्रेस पदाधिकारी एम. के. शेख यांनी सांगितले.