राज्यात कृषी महाविद्यालय स्थापनेचा विचार

0
15

>> मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच; जुने गोवेत कृषी अर्थशास्त्र परिषदेचे उद्घाटन

राज्यातील अनेक विद्यार्थी देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये कृषी, फलोत्पादन, वनीकरण आणि इतर कृषी विषयांचे शिक्षण घेत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आम्ही गोवा विद्यापीठांतर्गत गोव्यात कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा विचार करीत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. तसेच कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीसोबत सामंजस्य करार करण्यास तयार आहोत. याशिवाय आपण गोव्यात कृषी विद्यापीठ स्थापनेबाबतही विचार करू शकतो, असेही ते म्हणाले.
जुने गोवे येथे काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी अर्थशास्त्र या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि महाराष्ट्र सोसायटी ऑफ ऍगी्रकल्चर इकॉनॉमिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित केली आहे. यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी घेतलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकत मुख्यमंत्र्यांनी गोव्यात विशेष उत्पादनांना जीआय टॅगिंग करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे सांगितले. मानकुराद आंब्यासाठी आम्ही आधीच जीआय टॅगिंग घेतले आहे. मानकुराद गोव्यातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय आंब्याची जात आहे. गोवा फेणीसाठीही आम्ही जीआय टॅग घेतला आहे, असे त्यांनी नमूद केले. श्रीपाद नाईक यांनी शेती हा आपल्या देशाचा कणा आहे, असे सांगून जवळपास ६५ टक्के लोक शेतीवर अवलंबून असल्याचे सांगितले. कृषी क्षेत्राचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. सुधीर वाडकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.