राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

0
10

फोंडा, केपे, सांगे, काणकोण तालुक्याला फटका बसणार

गोवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून स्पष्ट, राज्यातील तापमानात

गोवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राज्याला उष्णतेच्या लाटेचा (हिट वेव्ह) इशारा दिला आहे. याचा सर्वाधिक फटका हा फोंडा, केपे, सांगे व काणकोण या तालुक्यांना बसणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वरील तालुक्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. सत्तरी, मुरगाव व सासष्टी तालुक्यांना केशरी तर डिचोलीला नारंगी व तिसवाडीला पिवळ्या रंगाचा अलर्ट देण्यात आला आहे.
या उष्णतेचा सामना करण्यासाठी लोकांनी भरपूर पाणी, ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी, शहाळ्याचे पाणी आदीचे सेवन करावे. सकाळी 11 ते दुपारी 4 या दरम्यान शक्य तो घरातच रहावे.

सुती व सैल कपडे परिधान करावेत ते हलक्या रंगाचे असावेत. उन्हात जाताना डोक्यावर टोपी घालावी तसेच डोळ्यांवर उन्हासाठीचा चष्मा वापरावा व सनस्क्रिनचा वापर करावा. ज्येष्ठ नागरिक व मुलांची विशेष काळजी घेतली जावी. गरोदर महिलांनी शक्य तो घरीच राहून आराम करावा, उघड्यावर काम करणारे कामगार व अन्यांनी भर दुपारी उन्हात जाऊन काम करणे टाळावे, घरात वातानुकुलीत यंत्रणा व पंखे चालू ठेवावेत, जास्त प्रथिने असलेले अन्न सेवन करू नये, अधुनमधून थंड पाण्याने आंघोळ
करावी.
उष्णतेमुळे भोवळ येणे, घाम येणे, अशक्तपणा येणे, रक्तदाब वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे असा त्रास झाल्यास डॉक्टरांकडे जावे, असे कळवण्यात आले आहे.

निसर्गाच्या हानीचा
परिणाम ः डॉ. कामत

राज्यात होत असलेला वाढता विकास व त्यासाठी निसर्गाची केली जाणारी हानी याचे परिणाम आता दिसून येऊ लागले असून राज्यातील तापमानात आता उच्चांकी वाढू होऊ लागली आहे. संशोधक डॉ. नंदकुमार कामत यांनी अन्साभाट – म्हापसा येथे गेले सलग तीन दिवस उच्चांकी तापमानाची नोंद झाल्याचे म्हटले आहे. आपल्या वैयक्तीक हवामान केंद्रावर या तापमान वाढीची नोंद झाल्याचे त्यानी म्हटले आहे.
अन्साभाट -म्हापसा येथे काल दुपारी 2.30 या दरम्यान कमाल तापमान 39.6 अंश सेल्सिअस एवढे होते. ऑक्टोबर महिन्यातील सरासरीपेक्षा ते तब्बल 6.6 अंशांनी जास्त होते. तापमान सरासरीपेक्षा खूपच जास्त वाढल्याने लोकांना असह्य अशा उकाड्याचा सामना करावा लागल्याचे कामत यांनी म्हटले आहे. ऑक्टोबरमधील सामान्य दैनिक कमाल तापमान हे 29.5 ते 33 अंश सेल्सिअस या दरम्यान असते. पण यंदा तापमानाचा पारा वाढल्याचे खात्याने स्पष्ट केले.

उद्या, परवा काही ठिकाणी पावसाची शक्यता

राज्यात उष्ण हवामान कायम असून पणजी शहरात राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान 37.4 अंश सेल्सिअस एवढे काल नोंद झाले आहे. पणजीत सामान्य तापमानापेक्षा 5.2 अंश सेल्सिअस एवढे अधिक तापमान नोंद झाले आहे. पणजीत किमान तापमान 24.7 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने राज्यात 15 रोजी कमाल तापमान 36-37 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर, 16 आणि 17 ऑक्टोबरला उत्तर गोवा आणि कुशावती जिल्ह्यातील काही भागात जोरदार वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात मागील दोन तीन दिवसांपासून कमाल तापमानात वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत पणजी येथे राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान 37.2 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले. तर, मुरगाव येथे सर्वांत कमी किमान तापमान 24.6 अंश नोंदवले गेले होते.
राज्यात 16 ऑक्टोबरनंतर कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. 16 ते 19 ऑक्टोबर दरम्यान कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस ते 36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची आणि 20 ऑक्टोबर रोजी ते आणखी कमी होऊन 34-35 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस कमाल तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून त्यानंतर त्यात हळूहळू घट होणार आहे. 16 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील काही भागांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्यातील घाट आणि लगतच्या भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.