राज्यात आतापर्यंत 44 इंच पाऊस

0
13

सांगे येथे आत्तापर्यंत सर्वाधिक 58.01 पावसाची नोंद झाली असून साळावली धरणामध्ये पाण्याचा साठा 79 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, राज्यात चोवीस तासांत 1.85 इंच पावसाची नोंद झाली आहे. तर, केपे येथे सर्वाधिक 4.35 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 43.76 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पावसाच्या तुटीचे प्रमाण 34.6 टक्क्यांवर आले आहे. येथील हवामान विभागाने 24 आणि 25 जुलैला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करून एलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यात पावसाचा चढउतार सुरू आहे. यामुळे काही वेळा तापमानात वाढ होऊन नागरिकांना उष्णतेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. राज्यात 7 जुलैनंतर पावसाचे प्रमाण कमी झाले होते. त्यानंतर 16 जुलैपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. राज्यात मागील सात दिवसांच्या (16 जुलै ते 22 जुलै) काळात 7.74 इंच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
चोवीस तासांत केपे येथे 4.35 इंच, सांगे येथे 3.27 इंच, मडगाव येथे 3.07 इंच, धारबांदोडा येथे 2.91 इंच, फोंडा येथे 2.59 इंच अशी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. तर, दाबोळी, काणकोण, साखळी, जुने गोवा, पणजी, पेडणे, म्हापसा आणि मुरगाव येथे मध्यम पावसाची नोंद झाली आहे.

सांग्यात 58 इंच पाऊस
राज्यात आत्तापर्यंत सांगे येथे सर्वाधिक 58.01 इंच पावसाची नोंद झाली आहे. तर, पणजी येथे सर्वांत कमी 27.91 इंच पावसाची नोंद झाली आहे. काणकोण येथे 56,40 इंच, धारबांदोडा येथे 55.24 इंच, केपे येथे 52.29 इंच अशा पावसाची नोंद झाली आहे. मडगाव येथे पाऊस इंचाच्या अर्ध शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. मडगावात आत्तापर्यंत 47.95 इंच पावसाची नोंद झाली आहे.
साळावली धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आत्तापर्यंत 79 टक्के पाण्याचा साठा झाला आहे. तिळारी धरणामध्ये 75 टक्के पाण्याचा साठा झाला आहे. अंजुणे धरणातील पाण्याचा साठा 44 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, पंचवाडी धरणामध्ये 64 टक्के पाण्याचा साठा झाला आहे.