राज्यात आतापर्यंत 32 इंच पाऊस

0
9

24 तासांत पडझडीच्या 144 घटना

9 जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता

राज्यात साधारणपणे 21 जूननंतर पडणाऱ्या जोरदार पावसामुळे 72 टक्क्यांवर पोहोचलेली पावसाची तूट आता 26 टक्क्यांवर आली आहे. राज्यात चोवीस तासांत 1.59 इंच पावसाची नोंद झाली. तर, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पडझडीच्या 144 घटनांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 32 इंच पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने राज्यात येत्या 9 जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करून येलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यात जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी नोंद झाले. जून महिन्यात पावसाच्या अभावामुळे राज्यातील धरणातील पाण्याचा साठा कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला होता. राज्यातील पावसाची तूट 72 टक्क्यांवर पोहोचली होती. तथापि, 21 जूननंतर पावसाने जोर धरल्याने शेतकरी वर्गाबरोबरच सर्वांना मोठा दिलासा मिळाला. राज्यातील धरणांतील पाणी साठा वाढत चालला आहे. राज्यात 21 जून ते 5 जुलै या कालावधीत 9 दिवस मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.

काणकोणात 47 इंच
राज्यात आतापर्यंत काणकोण येथे सर्वाधिक 47.57 इंच पावसाची नोंद झाली आहे. तर, राजधानी पणजीमध्ये 24 इंच अशा सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे. मडगाव येथे 38.92 इंच, धारबांदोडा येथे 36.39 इंच, सांगे येथे 33.33 इंच, वाळपई येथे 32.73 इंच, केपे येथे 32.15 इंच अशा पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील इतर सात विभागात 27 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात 20 जून ते 4 जुलै या पंधरा दिवसांत जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे झाडांच्या पडझडीच्या 708 घटनांची नोंद झाली आहे. यात सुमारे 71 लाख 21 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे.

12 लाखांचे नुकसान
राज्यात चोवीस तासांत जोरदार वाऱ्यामुळे झाडाच्या पडझडीच्या 144 घटनांची नोंद झाली असून सुमारे 12 लाख 2 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे. चोवीस तासांत साखळी येथे सर्वाधिक 3.6 इंच पावसाची नोंद झाली. वाळपई येथे 3.34 इंच, म्हापसा व पेडणे येथे प्रत्येकी 2.51 इंच, फोंडा येथे 1.80 इंच, केपे येथे 1.77 इंच अशा पावसाची नोंद झाली आहे.