राज्यातील पहिल्या खासगी विद्यापीठाचे उद्घाटन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल राज्यातील पहिल्या खासगी विद्यापीठाचे उद्घाटन कला अकादमीच्या आवारात करण्यात आले. राज्यात आणखी दोन खासगी विद्यापीठांना मान्यता देण्यात आली आहे. खासगी विद्यापीठामुळे गोव्यातील उच्च शिक्षणात नवीन पर्वाला सुरुवात झाली आहे. खासगी विद्यापीठांमुळे शिक्षण संस्थांमध्ये स्पर्धा वाढणार असून, त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे. यापुढे राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परराज्यात जावे लागणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्घाटन सोहळ्यात बोलताना केले.
आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात खासगी विद्यापीठ विधेयक मंजूर झाले. आपण सुरुवातीपासून राज्यात खासगी विद्यापीठांसाठी आग्रही होतो. सध्याच्या घडीला पारूल विद्यापीठात 550 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, 75 विद्यार्थी गोमंतकीय आहेत. तसेच, 70 टक्के कर्मचारी वर्ग स्थानिक आहे. आगामी काळात पारूल विद्यापीठात 1500 स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तसेच पारूलने स्थानिक विद्यार्थ्यांना 1.1 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना आवडत्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळाला नाही, तर परराज्यात शिक्षणासाठी जावे लागते. बऱ्याच विद्यार्थ्यांना परराज्यात जाऊन शिक्षण घेणे विविध कारणांमुळे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांना पारूल सारख्या खासगी विद्यापीठामुळे शिक्षणाची संधी मिळू शकते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यातील विद्यार्थ्यांना ट्युशन शुल्कात 20 टक्के सवलत दिली आहे. पारूल विद्यापीठामध्ये 14 प्रकारचे अभ्यासक्रम शिकविले जात आहे, असे डॉ. देवांशू पटेल यांनी सांगितले.
‘यापुढे आणखी खासगी विद्यापीठांना मान्यता नाही’
राज्यात तीन खासगी विद्यापीठांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आणखी खासगी विद्यापीठांना मान्यता दिली जाणार नाही. नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम असणारे एखाद्या विदेशी विद्यापीठाने संपर्क साधल्यास त्या प्रस्तावावर विचार केला जाऊ शकतो, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

