राज्यात आणखी एका वैद्यकीयमहाविद्यालयास केंद्राची मंजुरी

0
16

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने गोवा राज्यात आणखी एक वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिलेली असून त्यात 50 जागा असतील, असे म्हटले आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजेच 27-28 सालापासून राज्यात सुरू होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्राने गोव्याला आणखी एक वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे आभार मानले आहेत.

केंद्राने हे वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे गोवा राज्याला नवरात्रीनिमित्त दिलेली एक अनमोल अशी भेट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


गोमंतकीयांसाठी 50 टक्के जागा
या नव्या वैद्यकीय महाविद्यालयातील 50 टक्के म्हणजेच 25 जागा ह्या गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी आरक्षित करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली. राज्यात वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या साधनसुविधांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी पुढे स्पष्ट केले.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने देशातील दर एका वैद्यकीय महाविद्यालयाला 150 पेक्षा जास्त जागा मंजूर करायच्या नाहीत, अशी मर्यादा घातलेली आहे. त्यामुळे गोमेकॉतील वैद्यकीय जागांत आणखी वाढ होण्याची कोणतीही शक्यता नसून केंद्राने गोव्यासाठी नवे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे.

दरम्यान, केंद्राने गोव्यासाठी नवे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलेले असले तरी ते नेमके कुठे उभारण्यात येणार याची माहिती मिळू शकली नाही. मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नवे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जावे, अशी मागणी सदर इस्पितळाची इमारत उभी राहण्यापूर्वीपासूनच केली जात होती. मात्र, नंतर गोवा सरकारने तेथे वैद्यकीय महाविद्यालयाऐवजी नर्सिंग इन्स्ट्यूिट सुरू केले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर आता मंजूर झालेले नवे वैद्यकीय महाविद्यालय दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उभे राहिल की अन्य कुठे हे लवकरच स्पष्ट होणार आहे.