राज्यातील एकूण 12 केंद्रावर राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीची (नीट-युजी) परीक्षा कडक सुरक्षा व्यवस्थेत काल पार पडली. राज्य प्रशासनाने ही परीक्षा सुरळीतपणे घेण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला. सर्व केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या परीक्षेसाठी सुमारे चार हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नीट-युजी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून एनआयटी केंद्र कुंकळ्ळीची निवड केलेल्या काही विद्यार्थ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागले. या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना दिलेल्या परीक्षा कार्डावर एनआयटी कुंकळ्ळी असा उल्लेख केला होता. पण, विद्यार्थ्यांना पाठविलेल्या एसएमएस संदेशावर परीक्षा केंद्र म्हणून कुंकळ्ळीच्या ऐवजी फर्मागुडी फोंडा नोंद केल्याने काही पालकांना धावपळ करावी लागली. राज्यातील विद्यार्थ्यांना नीट-युजी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी कदंब महामंडळाने खास बसव्यवस्था उपलब्ध केली होती.

