राज्यातील सर्व विद्यालयांना इंटरनेट जोडणी मिळणार

0
7

>> राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

राज्यातील सर्वच विद्यालयांना इंटरनेट जोडणी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, ‘माझी लॅब, बरी लॅब’ या योजनेलाही मंजुरी देण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

आजच्या घडीला राज्यातील सर्व विद्यालयांना इंटरनेट जोडणी आवश्यक आहे. त्यामुळेच सर्वच विद्यालयांना इंटरनेट जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील तुरुंग कर्मचाऱ्यांचे वेतन पोलिसांच्या वेतनाच्या बरोबरीने आणण्यास मान्यता देण्यात आली आहे. साखळी बसस्थानकाचे कदंब महामंडळाकडे हस्तांतरण करण्यात येणार आहे. राज्य मध्यवर्ती कारागृहास पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास, तसेच पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून घेण्यास मान्यता दिली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

सरकारी खात्यामध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. महिला आणि बालकल्याण खाते, समाजकल्याण खाते आदी खात्याच्या सामाजिक योजनांच्या लाभार्थ्यांचे मानधन प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला त्यांच्या खात्यात जमा करण्याची सूचना केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.