राज्यातील भटक्या श्वानांच्या प्रश्नी उपाययोजनांसाठी कृती दल स्थापन

0
16

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआर भागातील सर्व भटक्या श्वानांना 8 आठवड्यांच्या आत पकडा आणि त्यांच्यासाठी उभारलेल्या निवारा केंद्रांमध्ये ठेवा, असे आदेश सोमवारी दिल्ली सरकारला दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाच्या पार्श्वभूमीवर, गोवा सरकारच्या पशुसंवर्धन खात्याने राज्यातील भटक्या श्वानांच्या प्रश्नी उपाययोजना आखण्यासाठी पशुसंवर्धन खात्याचे उपसंचालक डॉ. नितीन नाईक यांच्या नेतृत्वाखाली एका कृती दलाची स्थापना केली आहे.
सर्वोच्य न्यायालयाने दिल्लीतील भटक्या श्वानांना पकडण्याचा आदेश जारी केल्यानंतर गोव्याच्या पशुसंवर्धन खात्याच्या मंत्र्यांनी एक नोट जारी करून भटक्या श्वानांच्या प्रश्नी त्वरित उपाययोजना करण्याचा निर्देश जारी केला. त्यानंतर, पशुसंवर्धन विभागाने उपसंचालक डॉ. नितीन नाईक यांच्या नेतृत्वाखाली कृती दलाची स्थापना करून आवश्यक उपाययोजना अखण्याची सूचना केली आहे.

या कृती दल समितीवर सोनसडो येथील पशुवैद्यकीय इस्पितळाचे सहाय्य संचालक डॉ. अतानाझिया फर्नांडिस आणि एला जुने गोवा येथील सरकारी पोल्ट्री फार्मचे सहाय्यक संचालक डॉ. चार्लेट फर्नांडिस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील मोकाट श्वान पकडून त्यांचे निवारा केंद्रात (शेल्टर होम) पुनर्वसन करण्याचे काम या कृती दलाकडे सोपविण्यात आले आहे.