राज्यातील बाजारपेठांत लॉकडाऊन नियमभंगाचे वाढते प्रकार

0
145

लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात सामाजिक अंतर व इतर नियमांचा राज्यभरात फज्जा उडत आहे. राज्यभरातील विविध बाजारपेठांत सामाजिक अंतर नियमांचे पालन करण्यात येत नाही. गोव्याच्या शेजारील सिंधुदुर्ग, बेळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत अचानक झालेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात नियम पालनाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
गोवा राज्याचा हरित विभागात समावेश झाल्यानंतर उद्योग, व्यापार सुरू करण्यासाठी नियमांमध्ये जास्त शिथिलता देण्यात आलेली आहे. उद्योग, व्यवसाय करण्यासाठी नियम शिथिल केले असले तरी नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर्सचा वापर करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात राज्यातील रस्त्यावरील वाहनांच्या वर्दळीत मोठी वाढ झालेली आहे.

खासगी प्रवासी बसगाड्यांनी वाहतूक करण्यास सुरुवात केली आहे. बाजारपेठ, बसस्थानक या ठिकाणी सामाजिक अंतर सूचनेचे पालन होताना दिसत नाही. बाजारपेठ, मासळी मार्केट, बसस्थानक या प्रमुख ठिकाणी नियम केवळ कागदोपत्री ठेवले जात आहे. पोलिसांकडून मास्क न वापरणार्‍यांना दंड ठोठावला जातो. सामाजिक अंतराचे पालनाकडे आता लक्ष दिले जात नाही. व्यापार्‍याकडून सुध्दा सामाजिक अंतर नियमांच्या पालनाकडे लक्ष दिले जात नाही.