राज्यातील तपासणी नाक्यांवर देखरेखीसाठी मोबाईल ऍप

0
145

राज्यातील पत्रादेवी, दोडामार्ग, केरी- सत्तरी, मोले आणि पोळे-काणकोण या पाच प्रमुख तपासणी नाक्यांवर परराज्यांतून जीवनावश्यक वस्तू घेऊन प्रवेश करणार्‍या वाहनांवर देखरेख ठेवण्यासाठी अखेर मोबाईल ऍपचा वापर करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

राज्याच्या शेजारील बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने तपासणी नाक्यावरील वाहन तपासणी कडक करण्याची सूचना राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान महामंडळ, माहिती तंत्रज्ञान खाते यांनी इमेजिन वर्कच्या सहकार्याने वाहनांवर देखरेख ठेवण्यासाठी हा मोबाईल ऍप तयार केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन खास ऍप तयार केला आहे.

या ऍपच्या माध्यमातून आंतरराज्य वाहतूक करणार्‍या वाहनांवर पोलिसांकडून देखरेख ठेवली जाणार आहे. मान्यतेविना बेकायदा वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी हा ऍप उपयुक्त आहे.

राज्याच्या तपासणी नाक्यावर प्रवेश करणार्‍या वाहनाची ऍपवर नोंदणी केली जाणार आहे. तसेच सदर वाहन परत बाहेर कधी जाणार, वाहनातील सामान कुठे खाली केले जाणार, वाहन चालक, क्लीनर यांची माहिती नोंद केली जाणार आहे. ते वाहन सीमेबाहेर जाईपर्यंत त्याच्यावर ऍपद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे.