राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३५ वर

0
164

 >> मुख्यमंत्री ः दहावीची परीक्षा वेळापत्रकानुसारच

>> राजधानी एक्स्प्रेस या आठवड्यात स्थगित

राज्यातील कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या ३५ वर पोहोचली असून काल १३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाबाधितांमध्ये ३१ गोमंतकीय आणि ४ परराज्यातील नागरिकांचा समावेश आहे. नवी दिल्लीतून आलेल्या दोन राजधानी एक्सप्रेसमधून आत्तापर्यंत २० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे राजधानी एक्सप्रेस चालू आठवड्यासाठी स्थगित ठेवण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४१ झाली असून त्यातील ७ रुग्ण बरे झाले आहेत. परराज्यातून आलेल्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. महाराष्ट्रातून आलेल्यांमध्ये ३३ आणि कर्नाटकमधून आलेल्यांमध्ये २ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. परराज्यातून येणार्‍यांची कोरोना चाचणी करून त्यांना क्वारंटाईऩ केले जात आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असून परराज्यातून येणार्‍यांची माहिती देण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

रेल्वेतून ९० टक्के गोमंतकीय
नवी दिल्लीतून आलेल्या दोन रेल्वेगाडीतील २० प्रवाशांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याने सुमारे १५० जणांना १४ दिवसांच्या सरकारी क्वारंटाईनखाली ठेवण्यात आले आहे. नवी दिल्ली ते थिरुअनंतपुरम या रेल्वेगाडीतून एकही कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. या गाडीतून येणार्‍या प्रवाशांची संख्या कमी आहे. या गाडीतून येणार्‍यांची कोविड चाचणी करून प्रवेश दिला जाणार आहे. रेल्वेगाड्यांतून ९० टक्के गोमंतकीय आले आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

परराज्यातून येणार्‍याकडून कोविड चाचणीसाठी २ हजार रुपये स्वीकारण्याच्या निर्णयावर होणारी टीका अनावश्यक आहे. परराज्यातून येणार्‍या प्रवाशांना सशुल्क क्वारंटाईन सुविधेमध्ये ठेवले जाते. त्याठिकाणी राहणे, जेवण यासाठी वेगळे शुल्क आकारले जात नाही. राज्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये ३ वाहन चालक, १ क्लीनर, १ खलाशी, १ महिला, ५ जणांचे कुटुंब, २ मजूर आणि वास्कोतील कलकत्ता येथे बार्ज सोडण्यासाठी गेलेल्या २ जणांचा समावेश आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दहावीची परीक्षा वेळापत्रकानुसार
राज्यातील दहावीची परीक्षा वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत. सीमाभागांतील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमाभागातील शाळांमध्ये परीक्षा केंद्र सुरू केले जाणार आहे. परीक्षेसाठी २५६३ वर्ग खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. एका खोलील १२ पेक्षा जास्त विद्यार्थी असणार नाहीत. राज्यात कोरोनाचा सामाजिक फैलाव झालेला नसल्याने पालक व विद्यार्थ्यांनी घाबरण्याची गरज नाही. परराज्यातून आलेल्या होमक्वारंटाईन केलेल्या व्यक्तीवर देखरेख ठेवण्यासाठी आरोग्य अधिकारी, बीएलओ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

परराज्यातील मजुरांसाठी रेल्वे
राज्यात अडकून पडलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड या राज्यातील मजुरांना खास रेल्वेतून गावी रवाना केले जाणार आहेत. राज्यात सुमारे दीड लाख मजुरांनी गावी जाण्यासाठी नोंदणी केली आहे. आत्तापर्यंत १० हजार मजुरांना खास रेल्वेतून त्यांच्या गावी रवाना करण्यात आले आहेत. बिहार, पश्‍चिम बंगाल यांनी मजुरांसाठी रेल्वे गाडीचे बुकिंग केलेले नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या व्यवस्थापनांनी कर्मचार्‍यांनी कामावरून काढून टाकू नये. मजूर आयुक्तांना कंपन्यांतील कामगारांबाबत माहिती गोळा करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
शनिवार २३ मे रोजी इटलीतून ४१४ खलाशी व विदेशातील गोमंतकीयांना घेऊन ३ विमाने दाबोळी विमानतळावर येणार आहेत. विमानातून येणार्‍या प्रवाशांची कोविड चाचणीसाठी नमुने घेण्यासाठी खास केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यातील हॉटेल व्यावसायिकांनी येत्या ३१ मेपर्यंत आपल्या हॉटेलमध्ये पर्यटकांना आणून ठेवू नये. केंद्र सरकारचे पर्यटनाबाबत दिशानिर्देश जारी झाल्यानंतर राज्य सरकारकडून पर्यटनाबाबत दिशानिर्देश जारी केले जाणार आहेत, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.

पतसंस्थांचे विलीनीकरण नाही
राज्यातील सहकारी बँका, पतसंस्थांचे विलीनीकरण होणार नाही. सहकारी बँका, पतसंस्थांच्या विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही. सहकारी बँका, पतसंस्थांतील गुंतवणूकदार, खातेदारांनी आपली गुंतवणूक बंद करू नये. म्हापसा अर्बन बँकेचा विषय वेगळा आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

महाविद्यालयीन प्रथम, द्वितीय
वर्षाच्या अंतिम परीक्षा रद्द
गोवा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०१९ – २०२० मध्ये संलग्न विविध अभ्यासक्रमातील (बी.ए., बी.एस्सी. (होम सायन्सचा समावेश), बी.कॉम., बी.बी.ए, बी.सी.ए., बी. एस. डब्लू ) प्रथम आणि द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी अंतिम परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांच्या आधारे पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. तृतीय वर्षाच्या अंतिम परीक्षा, प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या पुरवणी परीक्षा १ जुलै २०२० नंतर घेतल्या जाणार आहेत. यासंबंधीचे परिपत्रक विद्यापीठाचे निबंधक प्रा. वाय. व्ही. रेड्डी यांनी जारी केले आहे.

आंतरराज्य वाहतुकीस परवानगी नाही
लॉकडाऊन ४ मध्ये गोव्यातून तूर्तास आंतरराज्य प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली जाणार नाही. लॉकडाऊनच्या इतर नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न केलेल्या ११५०० जणांना दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच थुंकल्याप्रकरणी ६८०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
भाजप आमदारांच्या बैठकीत राज्यातील कोरोनाची स्थितीवर चर्चा करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर चर्चा करण्यात आली. या पॅकेजचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. तसेच कोरोना विषाणूच्या विरोधातील लढ्यातील पुढील जबाबदारीवर चर्चा करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.