राज्यातील किनाऱ्यांची धूप रोखण्यासाठी अभ्यास सुरू

0
7

जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यातील किनारपट्टीची धूप होण्याचे प्रकार वाढू लागले असून, त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांना धोका निर्माण होऊ लागलेला आहे. पर्यावरणासंबंधीची ही समस्या दूर करण्यासाठी यावर काय तोडगा काढता येईल हे जाणून घेण्यासाठी गोवा सरकारने अभ्यास सुरू केला आहे. त्याद्वारे व्यापक व दीर्घकालीन व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. काल पर्यावरण दिनानिमित्त दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.

समुद्र किनाऱ्यांची होणारी धूप जर अशीच चालू राहिली, तर राज्यातील किनारेच नष्ट होतील. परिणामी राज्याच्या पर्यावरणावर तसेच पर्यटनावर त्याचा अनिष्ट परिणाम होईल. त्यामुळे किनारपट्टीची धूप थांबवणे ही काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील प्रमुख किनाऱ्यांची होणारी धूप, त्याची कारणे व उपाययोजना याचा अभ्यास तज्ञांच्या मदतीने केला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तसेच स्थानिक प्रशासन, पर्यावरणतज्ज्ञ व पर्यटन खाते यांच्यात समन्वय साधून पर्यावरणपूरक उपायांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी पुढे स्पष्ट केले. परिणामी किनाऱ्यांचे रक्षण होण्यास मदत होणार होईल. त्याचा फायदा मच्छिमार व मासळी उद्योगावर अवलंबून असलेल्या अन्य घटकांनाही होणार असल्याचे ते म्हणाले.

स्थानिक लोक तसेच पर्यटकांना आकर्षित करणारे किनारे सुरक्षित रहावेत व भावी पिढ्यांसाठी या किनारपट्टीचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.