Home बातम्या राज्यातील अल्पसंख्यकांना सरकारने गृहीत धरू नये : राष्ट्रवादी

राज्यातील अल्पसंख्यकांना सरकारने गृहीत धरू नये : राष्ट्रवादी

0

बायंगिणीत कचरा प्रक्रिया प्रकल्प नको

बायंगिणी (जुने गोवे) येथील प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्प गोवा मांस प्रकल्पातील गैरप्रकार या अनुषंगाने राज्यातील अल्पसंख्यकांना सरकारने गृहीत धरू नये असा इशारा काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत दिला.

सरकारने बायंगिणी येथे कचरा प्रक्रिया उभारण्याची प्रक्रिया थांबवावी अशी आपल्या पक्षाची मागणी असल्याचे डिमेलो यांनी सांगितले. अल्पसंख्यकांच्या भावनांना हे सरकार कसपटा समान लेखत असल्याचा दावा त्यांनी केला.

२०००-२००४ या कालावधीत गोव्यात भाजपचे सरकार सत्तेवर होते. त्यावेळी राज्यातील कचरा प्रश्‍न सोडवण्यात यांना अपयश आले व त्याचे परिणाम आज भोगावे लागत असल्याचे ते म्हणाले.

नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात शहर विकास खात्याच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देण्याच्या वेळी खात्याचे मंत्री फ्रान्सिस डिसोझा सोयीस्करपणे गैरहजर राहिले आणि त्यांच्यावतीने मुख्यमंत्री पर्रीकर यांनी उत्तर देताना ‘यू टर्न’ घेतल्याचा दावा डिमेलो यांनी केला. पर्रीकर यांनी त्यावेळी सांगितले की, बायंगिणी येथे एक अद्ययावत कचरा प्रक्रिया उभारण्यात येणार आहे. त्यांच्या वक्तव्याने अल्पसंख्यकांत धक्का बसला आहे. कारण ओल्ड गोव्याची जागतिक वारसा स्थळे असलेली चर्चेस तसेच सेंट ऑगास्टिन मनोरा या प्रस्तावित प्रकल्पापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.

डिमेलो यांनी याच अनुषंगाने मुख्यमंत्री पर्रीकर यांना आव्हान दिले की जगात कोणत्याही जागतिक वारसा स्थळापासून १ कि. मी. च्या अंतरात कचरा प्रक्रिया प्रकल्प असल्यास त्यांनी दाखवून द्यावे.

पणजी महानगरपालिकेनेही सरकारला कळवावे की, आपण बायंगिणी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प हाताळणार नाही, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात जनावरांच्या मांसाचा तुटवडा निर्माण होण्यासही भाजप सरकार कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. गोवा मांस प्रकल्पातील गैरप्रकार होण्यास राज्य सरकार व गोवंश रक्षा अभियान यांच्यातील संगनमत कारणीभूत असल्याचा दावा त्यांनी केला. या विषयावरील न्यायालयात याचिका दाखल करणारे हनुमंत परब हे भाजपचे कार्यकर्ते असल्यावरून या प्रकरणाला वेगळाच वास येत असल्याचा सूर त्यांनी व्यक्त केला.